प्रतिनिधी | नांदेड
महाराष्ट्रातील नांदेड शहरातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. नांदेडमध्ये सुरू असलेल्या एका अवैध मसाज सेंटरवर पोलिसांनी धाड टाकली असून, या कारवाईदरम्यान देहविक्रीच्या दलदलीत अडकलेल्या चार महिलांची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेडमधील एका भागात मसाज सेंटरच्या आडोशाने अनैतिक प्रकार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत संबंधित मसाज सेंटरवर अचानक छापा टाकला.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम (PITA) कलम ४, ५, ६ आणि ७ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या काळेधंद्याचे जाळे नेमके कुठे-कुठे पसरले आहे आणि यात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा सखोल तपास आता विमानतळ पोलीस करत आहेत.

