नांदेड प्रतिनिधी
गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी नांदेड ग्रामीण पोलिसांनी राबविलेल्या ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत बुधवारी मध्यरात्री मोठी कारवाई करत तब्बल ४३ लाख ५० हजार रुपयांचा घातक शस्त्रसाठा जप्त केला. तलवारी, खंजीर, कुकरी, गुप्त्या आणि अन्य धारदार शस्त्रांचा समावेश असलेल्या या कारवाईमुळे नांदेड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला असून एका संशयिताचा शोध सुरू आहे.
नांदेड ग्रामीण पोलिसांनी बळीरामपूर परिसरात बुधवारी रात्री गस्तीदरम्यान अभिजित गिरीधर सातपुते याच्याकडून एक घातक शस्त्र जप्त केले होते. संशयिताची चौकशी करताना पोलिसांना मोठ्या शस्त्रसाठ्याची माहिती मिळाली. त्यानंतर नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
या पथकाने वजिराबाद पोलिसांच्या मदतीने गुरू रामदासनगर परिसरातील एका ठिकाणी छापा टाकला. या कारवाईदरम्यान पोलिसांना मोठ्या प्रमाणात धारदार शस्त्रांचा साठा आढळून आला. पोलिस घटनास्थळी पोहोचताच तेथील एका व्यक्तीने पळ काढल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पोलिसांनी जप्त केलेल्या शस्त्रांमध्ये ३५० तलवारी, ३ हजार ९५२ खंजीर, ३३८ गुप्त्या, २८ कुकरी आणि २८ फोरग्रीप खंजीरांचा समावेश आहे. याशिवाय शस्त्रनिर्मितीसाठी लागणारे साहित्यही हस्तगत करण्यात आले आहे. एकूण ४ हजार ७९६ घातक शस्त्रे जप्त करण्यात आली असून त्यांची अंदाजित किंमत ४३ लाख ५० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्राथमिक तपासात हा शस्त्रसाठा जसवंतसिंग प्रकाशसिंग सुखमणी (रा. अबचलनगर) याने जमा केल्याचे समोर आले आहे. अभिजित सातपुते आणि जसवंतसिंग सुखमणी या दोघांविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा नांदेडमध्ये कशासाठी जमा करण्यात आला होता, त्याचा पुरवठा कुठून होत होता आणि या मागे कोणते मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. आगामी सण-उत्सव आणि कायदा-सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.


