सातारा प्रतिनिधी
निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला असून मार्च महिन्याच्या अखेरीस आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार, जिल्ह्यातील ५५ हून अधिक गावांतील तब्बल ६०२ शेतकरी बाधित झाले असून सुमारे २४३.१९ हेक्टर क्षेत्रावरील पिके आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. काढणीच्या टप्प्यावर आलेली पिके पावसामुळे भिजल्याने, तर काही ठिकाणी झालेल्या गारपिटीमुळे पूर्णपणे आडवी झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यातील फलटण, खंडाळा, सातारा, वाई, जावळी, खटाव, माण आणि कराड या तालुक्यांना या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. विशेषतः फलटण तालुका सर्वाधिक बाधित ठरला असून तब्बल १२४.९० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या भागात डाळिंब आणि आंब्याच्या बागांना मोठा फटका बसल्याचे समोर आले आहे.
फलटणमध्ये डाळिंब बागांचे मोठे नुकसान
मार्च महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे फलटण तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक झळ बसली आहे. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार १०७ हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील डाळिंब बागा बाधित झाल्या आहेत. काढणीच्या उंबरठ्यावर असलेली फळे पावसामुळे खराब झाली असून अनेक बागांमध्ये गारपिटीमुळे फळगळही झाली आहे.
खंडाळा तालुक्यात गहू आणि आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक शेतांमध्ये कापणीसाठी तयार असलेला गहू पावसामुळे भिजून निकामी झाला आहे. तसेच आंब्याच्या बागांमध्ये मोहर गळून पडल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
विविध पिकांचे मोठे नुकसान
जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक पंचनाम्यानुसार डाळिंब, गहू, आंबा, ज्वारी आणि कांदा या पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. नुकसानीची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे :
• डाळिंब : १११ हेक्टर
• गहू : ४७ हेक्टर
• आंबा : २८ हेक्टर
• ज्वारी : २१.१७ हेक्टर
• कांदा : १० हेक्टर
याशिवाय अनेक भागांत भाजीपाला, हरभरा आणि कलिंगड या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. काढणीच्या टप्प्यावर असलेली ही पिके पावसामुळे पूर्णपणे नष्ट झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
मार्चमध्ये ४१२ शेतकरी बाधित
अवकाळी पावसाचा फटका सर्वप्रथम मार्च महिन्याच्या अखेरीस बसला. त्या काळात ४१२ शेतकऱ्यांच्या सुमारे १९२.२१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर एप्रिलच्या सुरुवातीला पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आणखी ११० हेक्टरहून अधिक क्षेत्र बाधित झाले आहे.
एप्रिलमध्ये विशेषतः वाई, खंडाळा, फलटण, जावळी, खटाव आणि कराड तालुक्यांना मोठा फटका बसला. वाई तालुक्यात सुमारे १० हेक्टरवरील पिके आडवी झाली, तर फलटण तालुक्यात १४ हेक्टरवरील आंब्याच्या बागांचे नुकसान झाले आहे.
गारपिटीने कलिंगड पिके उद्ध्वस्त
अनेक शेतकऱ्यांच्या काढणीसाठी तयार असलेल्या पिकांचे गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. एका बाधित शेतकऱ्याने सांगितले,
“माझ्यासह गावातील पाच शेतकऱ्यांचे काढणीला आलेले लाखो रुपयांचे कलिंगड गारपिटीमुळे पूर्णपणे नष्ट झाले. पंचनामे झाले आहेत. आता लवकरात लवकर मदत मिळावी, हीच अपेक्षा आहे.”
जीवितहानी आणि पशुधनाचे नुकसान
अवकाळी पावसामुळे केवळ पिकांचेच नाही तर जीवितहानीही झाली आहे. माण आणि कराड तालुक्यात वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे २५ हून अधिक शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडून गेली असून सोलर पॅनलचेही मोठे नुकसान झाले आहे.
पंचनामे युद्धपातळीवर
सध्या महसूल आणि कृषी विभागामार्फत तलाठी, कृषी सहाय्यक आणि संबंधित अधिकारी पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर करत आहेत. बाधित शेतकऱ्यांची यादी तयार करून ती शासनाकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
शासनाकडून मदतीचे आश्वासन
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले की,
“मार्च महिन्याच्या अखेरीस आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे सातारा जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत काढणीला आलेल्या पिकांचे आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्यांचे पशुधन हिरावले गेले आहे त्यांना तत्काळ तात्पुरती मदत देण्यात आली आहे. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले असून शासनाच्या नियमांनुसार बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाईल.”
अवकाळी पावसामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर आणखी एक मोठे संकट ओढवले असून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी, अशी अपेक्षा जिल्ह्यातील शेतकरी व्यक्त करत आहेत.


