सातारा प्रतिनिधी
महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी रस्ते प्रकल्पांमध्ये आता आणखी एका मोठ्या महामार्गाची भर पडणार आहे. शक्तीपीठ महामार्ग या प्रकल्पाच्या सुधारित आराखड्याला राज्य शासनाने मान्यता दिल्यानंतर हा महामार्ग सातारा जिल्ह्यातूनही जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे साताऱ्यासह राज्यातील अनेक भागांच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
सुमारे ७६० किमी लांबीच्या या महामार्गामुळे नागपूर ते गोवा प्रवासाचा कालावधी तब्बल १८ तासांवरून फक्त ८ तासांपर्यंत कमी होणार आहे. या महामार्गामुळे राज्यातील १३ जिल्हे, ४० तालुके आणि सुमारे ४०० गावे एकमेकांशी थेट जोडली जाणार आहेत.
दरम्यान, महाराष्ट्राच्या विकासाला वेग देणाऱ्या समृद्धी महामार्ग नंतर आता शक्तीपीठ महामार्ग हा राज्यातील आणखी एक महत्त्वाचा प्रकल्प ठरणार असल्याचे मानले जात आहे.
साताऱ्याला मिळणार मोठा फायदा
सुधारित आराखड्यानुसार हा महामार्ग सातारा जिल्ह्यातून पुढे जाणार आहे. यामुळे सातारा आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवास अधिक जलद व सुलभ होणार आहे.
प्रकल्पाचा खर्च सुमारे १ लाख १ हजार कोटी रुपये इतका असल्याचे सांगितले जात आहे.
यापूर्वी या महामार्गाचा मार्ग कोल्हापूर जिल्हा आणि सांगली जिल्हा परिसरातून जाणार होता. मात्र जमीन अधिग्रहणाला स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध झाल्यानंतर राज्य सरकारने त्या मार्गाची अधिसूचना रद्द केली. त्यानंतर नव्याने आराखडा तयार करण्यात आला असून त्यात साताऱ्याचा समावेश करण्यात आला आहे.
सुधारित आराखड्यातील मार्ग
नव्या आराखड्यानुसार हा महामार्ग वर्ध्यातील दिग्रज ते सिंधुदुर्गातील बांदा या दरम्यान धावणार आहे.
मूळ आराखड्यातील काही जिल्ह्यांमध्ये बदल करण्यात आले असले तरी वर्धा, यवतमाळ, बीड आणि लातूर या जिल्ह्यांतील मार्ग पूर्ववत ठेवण्यात आला आहे.
21 तीर्थक्षेत्रांना मिळणार जोड
या महामार्गामुळे राज्यातील अनेक धार्मिक स्थळांना थेट जोड मिळणार आहे. त्यामध्ये प्रमुख शक्तीपीठांचा समावेश आहे.
या महामार्गामुळे खालील महत्त्वाची तीर्थक्षेत्रे जोडली जाणार आहेत –
माहूरगड
• तुळजापूर
• कोल्हापूर
• अंबेजोगाई
तसेच गुरुस्थळे व अन्य धार्मिक स्थळेही या मार्गाशी जोडली जाणार आहेत, त्यामध्ये-अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर, पंढरपूर, ज्योतिबा मंदिर, परळी वैद्यनाथ आणि औंढा नागनाथ यांचा समावेश आहे.
पूर्व-पश्चिम महाराष्ट्राचा वेग वाढणार
हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर विदर्भ ते कोकण असा राज्याचा पूर्व-पश्चिम भाग अधिक वेगाने जोडला जाईल. धार्मिक पर्यटन, उद्योग आणि व्यापार यांना मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच गोव्याकडे जाणारा प्रवासही अधिक सोपा आणि जलद होणार आहे.


