मुंबई प्रतिनिधी
आयटी क्षेत्रात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. जागतिक तंत्रज्ञान कंपनी Oracle Corporation (ओरॅकल कॉर्पोरेशन) ने भारतासह अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करण्यास सुरुवात केली असून एका ई-मेलमुळे हजारो कर्मचाऱ्यांचे करिअर एका क्षणात संपुष्टात आले. कंपनीकडून पाठवण्यात आलेल्या अचानक ई-मेलमुळे सुमारे १२ हजार भारतीय कर्मचारी बेरोजगार झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे सुमारे सकाळी ६ वाजता कर्मचाऱ्यांच्या अधिकृत मेल आयडीवर ‘ओरॅकल लीडरशिप’कडून एक संदेश पाठवण्यात आला. त्या मेलमध्ये कंपनीच्या संघटनात्मक बदलांचा भाग म्हणून तुमचा कार्यकाळ तत्काळ संपुष्टात आणला जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे अनेक कर्मचाऱ्यांना याबाबत कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. एचआर विभाग किंवा संबंधित मॅनेजरकडून कोणतीही चर्चा किंवा इशारा न देता थेट मेलद्वारे ही माहिती देण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
३० टक्क्यांपर्यंत कर्मचारी कपात
कंपनीने आपल्या विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली आहे. विशेषतः नेटसूट इंडिया डेव्हलपमेंट सेंटरमध्ये प्रॉडक्ट मॅनेजर, सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि मॅनेजर स्तरावरील कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले.
तसेच Revenue and Health Sciences आणि SVOS (SaaS and Virtual Operations Services) या विभागांमध्ये सुमारे ३० टक्क्यांपर्यंत कर्मचारी कपात करण्यात आल्याचे समजते. काही टीममध्ये तर एकाच वेळी १५ ते १६ पेक्षा अधिक इंजिनिअर्सना कामावरून कमी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
सिस्टीमवर त्वरित बंदी
कर्मचारी कपातीचा निर्णय कळवल्यानंतर लगेचच अनेक कर्मचाऱ्यांचा कंपनीच्या सिस्टीम आणि नेटवर्कवरील प्रवेश बंद करण्यात आला. काही कर्मचाऱ्यांना ३ एप्रिलपर्यंत काम करण्याची परवानगी देण्यात आली असून त्यानंतर त्यांना एक महिन्याची ‘गार्डन लीव्ह’ देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
लॅपटॉपमध्ये ट्रॅकिंग टूल्स
कंपनीने कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांच्या अधिकृत लॅपटॉपमध्ये ट्रॅकिंग टूल्स इन्स्टॉल केल्याची माहितीही समोर आली आहे. तसेच कंपनीचा कोणताही डेटा किंवा कोड कॉपी न करण्याचा कठोर इशारा कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे.
आणखी मोठ्या कपातीची शक्यता
सध्याच्या कपातीमुळे आयटी क्षेत्रात अस्वस्थता वाढली आहे. उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, येत्या काही महिन्यांत आणखी २० ते ३० हजार कर्मचारी नोकरी गमावू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रात पुन्हा एकदा नोकरीची असुरक्षितता वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
अचानक आलेल्या या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळण्याची शक्यता असून आयटी क्षेत्रात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.


