रणजीत मस्के | प्रतिनिधी
अहिल्यानगर | पोखर्डी शिवारात कोंबड्यांच्या अवैध झुंजी लावून त्यावर पैशांचा जुगार खेळणाऱ्या २१ जणांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. या कारवाईत पोलिसांनी सुमारे २४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, पोखर्डी गावाजवळील पिंपळगाव-उजनी रस्त्यालगत एका मोकळ्या जागेत कापडी मंडप उभारून कोंबड्यांच्या झुंजी लावल्या जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने रविवारी (दि. २९) सायंकाळी छापा टाकला.
छाप्यात काही जण कोंबड्यांची झुंज लावत असल्याचे तसेच उपस्थितांपैकी काही जण त्या झुंजीवर पैसे लावत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ २१ जणांना ताब्यात घेतले.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (ब) तसेच प्राण्यांवरील क्रूरतेस प्रतिबंध करण्यासंबंधीच्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.


