विशाखापट्टणम:
देशाला हादरवून सोडणाऱ्या २०२२ मधील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणासारखी आणखी एक धक्कादायक घटना आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे उघडकीस आली आहे. भारतीय नौदलातील एका विवाहित कर्मचाऱ्याने आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे केले आणि काही तुकडे घरातील फ्रिजमध्ये ठेवले, तर काही तुकडे बॅगेत भरून बाहेर फेकल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र (पूर्ण नाव अद्याप स्पष्ट नाही) असे या संशयित नौदल कर्मचाऱ्याचे नाव असून तो भारतीय नौदलाच्या एका जहाजावर कार्यरत आहे. तर हत्या झालेल्या महिलेचे नाव पोलिपल्ली मोनिका (२९) असे आहे.
डेटिंग अॅपवरून ओळख, नंतर प्रेमसंबंध
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ३५ वर्षीय रवींद्र आणि मोनिका यांची ओळख एका डेटिंग अॅपच्या माध्यमातून झाली होती. सुरुवातीला मैत्री असलेले हे संबंध कालांतराने प्रेमसंबंधात बदलले. दोघेही विशाखापट्टणममधील विविध उद्याने, सिनेमागृहे आणि सार्वजनिक ठिकाणी वारंवार भेटत असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.
पत्नी माहेरी गेल्याचा फायदा
दरम्यान, रवींद्रची पत्नी चिंतादा ही काही दिवसांसाठी माहेरी गेली होती. पत्नी घरी नसल्याचा फायदा घेत रवींद्रने मोनिकाला आपल्या घरी बोलावून घेतले. सुरुवातीला दोघांमध्ये सामान्य चर्चा सुरू होती. मात्र काही कारणावरून अचानक दोघांमध्ये तीव्र वाद झाला.
संतापाच्या भरात सुरीने हत्या
वाद विकोपाला गेल्यानंतर रवींद्रने संतापाच्या भरात मोनिकावर सुरीने वार केले. गंभीर जखमी झालेल्या मोनिकाचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी रवींद्रने मोनिकाच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले.
यानंतर त्याने शरीराचे काही तुकडे बॅगेत भरून अज्ञातस्थळी फेकून दिले, तर उरलेले तुकडे घरातील फ्रिजमध्ये ठेवले. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
आरोपीने स्वतः पोलिसांत दिली कबुली
धक्कादायक बाब म्हणजे रवींद्र स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तत्काळ त्याच्या घरी धाव घेतली असता फ्रिजमध्ये मानवी शरीराचे तुकडे आढळून आले. मात्र मृत महिलेचे डोके घटनास्थळी सापडले नाही. आरोपीने ते इतरत्र कुठेतरी टाकून दिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पैशांवरून वाद झाल्याचा दावा
पोलिस चौकशीत रवींद्रने दावा केला की, मोनिकाने त्याच्याकडून सुमारे साडेतीन लाख रुपये घेतले होते. तसेच दोघांमधील संबंध पत्नीला सांगण्याची धमकी ती देत होती. यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि त्यातूनच ही घटना घडल्याचे आरोपीचे म्हणणे आहे. मात्र या दाव्याची पोलिसांकडून तपासणी सुरू आहे.
श्रद्धा वालकर प्रकरणाची आठवण
या घटनेमुळे देशाला हादरवून सोडणाऱ्या २०२२ मधील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची आठवण पुन्हा एकदा ताजी झाली आहे. त्या प्रकरणात दिल्लीतील फ्लॅटमध्ये श्रद्धाचा लिव्ह-इन पार्टनर आफताब अमीन पूनावाला याने तिची हत्या करून शरीराचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवले होते आणि नंतर दिल्लीतील विविध ठिकाणी ते टाकून दिले होते.
विशाखापट्टणममधील या नव्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा देशभरात संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक सखोल तपास सुरू केला आहे.


