मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणात सोमवारी एक महत्त्वाची आणि चर्चेची घडामोड घडली. राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित युवा नेते पार्थ पवार यांनी अचानक शिवतीर्थ येथे जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या अनपेक्षित भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
माहितीनुसार, पार्थ पवार सकाळी अचानक शिवतीर्थवर पोहोचले. काही वेळ ते राज ठाकरे यांच्यासोबत बंद दरवाजाआड चर्चा करत होते. या भेटीत नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. भेटीनंतर पार्थ पवार कोणतीही प्रतिक्रिया न देता थेट आपल्या कारमध्ये बसून निघून गेले. त्यामुळे या भेटीमागचे कारण अद्याप गूढच राहिले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच रोहित पवार यांनी देखील शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्या भेटीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून देण्यात आली होती. त्यामुळे पार्थ पवार यांच्या भेटीचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का, याबाबतही चर्चा रंगू लागल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांचे नाव सध्या राज्यसभा सदस्यत्वासाठी चर्चेत असल्याने या भेटीला अधिक राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद स्वीकारले आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पार्थ पवार यांचे नाव पुढे येत असल्याचे सांगितले जात आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेतृत्वाची जबाबदारी मोठ्या प्रमाणात सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर आली आहे. सध्या त्या पक्षाच्या अध्यक्षपदी कार्यरत असून विधिमंडळातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्या म्हणून त्यांच्याकडे सूत्रे आहेत.
दरम्यान, पार्थ पवार आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी काळात या भेटीचे नेमके राजकीय परिणाम काय होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


