मुंबई प्रतिनिधी
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील सर्व प्रकारच्या शाळांना यंदा २ मेपासून उन्हाळी सुटी जाहीर करण्यात येणार असून २०२६-२७ या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात १५ जून २०२६ पासून होणार आहे. शिक्षण संचालनालयाने प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांसाठी याबाबत अधिकृत आदेश जारी केला आहे.
सध्या २०२५-२६ हे शैक्षणिक वर्ष अंतिम टप्प्यात असून एप्रिल महिन्यापासून राज्यभरात वार्षिक परीक्षांना सुरुवात होत आहे. जिल्हा परिषद तसेच सर्व माध्यमांच्या आणि विविध संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात बहुतेक शाळांमधील वार्षिक परीक्षा पूर्ण होण्याची शक्यता आहे.
परीक्षा संपल्यानंतर शाळांकडून निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू होईल. १ मेपर्यंत बहुतेक शाळांचे निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून त्यानंतर चालू शैक्षणिक वर्षाची औपचारिक सांगता होईल. त्यानंतर लगेचच विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटी लागणार आहे.
शिक्षण संचालनालयाचे अधिकारी महेश पालकर आणि शरद गोसावी यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या आदेशानुसार १५ जूनपासून राज्यभरातील शाळा पुन्हा सुरू होतील. मात्र विदर्भासह काही भागांमध्ये उन्हाची तीव्रता लक्षात घेता स्थानिक हवामान परिस्थितीनुसार शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.
जून महिन्यातील वाढत्या तापमानाचा विचार करून शाळांसाठी विशेष वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. १५ जून ते २१ जून या कालावधीत शाळा सकाळच्या सत्रात म्हणजेच सकाळी ७ ते ११.१५ या वेळेत भरवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन ३० जूनपासून शाळा नियमित वेळेत सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, शिक्षण संचालनालयाने राज्यातील सर्व मान्यताप्राप्त शाळांना या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि उन्हाळ्याच्या तीव्रतेचा विचार करूनच वेळापत्रक आखण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.
यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटीची प्रतीक्षा आता संपणार असून नवीन शैक्षणिक वर्षाची तयारीही सुरू होणार आहे.


