मुंबई प्रतिनिधी
हार्दिक पंड्या या नावाभोवती नेहमीच चर्चेचं वलय असतं. पण यावेळी त्याने खेळामुळे नव्हे, तर मोठ्या मनामुळे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आयपीएल 2026 हंगामाच्या सुरुवातीच्या तोंडावर पंड्याने मुंबई इंडियन्स च्या चाहत्यांसह वानखेडेवरील कर्मचाऱ्यांचीही मनं जिंकली आहेत.
Hardik Pandya gave ₹10 lakh each to the groundsmen at Wankhede Stadium as a token of gratitude.
He had promised them the amount for assisting with his late-night practice sessions during the T20 World Cup.
A commendable gesture from the all-rounder towards the support staff… pic.twitter.com/HtyEgd8J2T
— Being Political (@BeingPolitical1) March 27, 2026
आयपीएलच्या नव्या हंगामासाठी आता अवघे 24 तास उरले असताना, पंड्याने वानखेडे स्टेडियम येथील 11 ग्राऊंड स्टाफ कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 10 लाख रुपयांचे धनादेश देत तब्बल 1 कोटी 10 लाख रुपयांची मदत केली.
रात्री उशिरापर्यंत सराव; कर्मचाऱ्यांची साथ
आयपीएलसह आगामी ICC Men’s T20 World Cup लक्षात घेऊन हार्दिक पंड्या गेल्या काही दिवसांपासून वानखेडेवर सराव करत होता. पंड्या अनेकदा रात्री उशिरापर्यंत मैदानावर सराव करत असल्याने ग्राऊंड स्टाफलाही त्याच्यासाठी उशिरापर्यंत थांबावे लागत होते.
मैदान तयार ठेवणे, लाईट्स, पिच आणि इतर सुविधा सांभाळण्यासाठी कर्मचाऱ्यांनी घरी न जाता रात्रभर मेहनत घेतली. पंड्याच्या सरावासाठी त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही. ही गोष्ट पंड्याच्या मनाला भिडली.
“मी तुमच्यासाठी काहीतरी करेन” – पंड्याचा शब्द
या काळात पंड्याने कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना, “तुम्ही माझ्यासाठी इतकी मेहनत घेत आहात. संधी मिळाली तर मी नक्की तुमच्यासाठी काहीतरी करेन,” असा शब्द दिला होता.
आता आयपीएल हंगामाच्या सुरुवातीपूर्वी त्याने तो शब्द पाळत 11 ग्राऊंड स्टाफ कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 10 लाख रुपयांचे धनादेश देत त्यांचे आभार मानले. पंड्याच्या या कृतीमुळे क्रिकेट वर्तुळात त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
आयपीएलची रंगत; मुंबई इंडियन्सवर लक्ष
दरम्यान, आयपीएल 2026 हंगामाची सुरुवात लवकरच होणार असून पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि सनराईस हैदराबाद ज्आमनेसामने येणार आहेत. तर मुंबई इंडियन्सचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध होणार आहे.
गेल्या दोन हंगामात अपेक्षित कामगिरी करता न आल्याने यंदा हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स नव्या जोमाने मैदानात उतरणार आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स सहाव्यांदा आयपीएल ट्रॉफी उंचावणार का? याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
पण ट्रॉफी जिंकण्यापूर्वीच हार्दिक पंड्याने आपल्या मोठ्या मनाने चाहत्यांची मने जिंकली, एवढे मात्र नक्की.


