रत्नागिरी प्रतिनिधी
रत्नागिरी शहरासह जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल व्यवसाय संकटात सापडला आहे. गेल्या काही दिवसांपासून गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे शहरातील सुमारे २५० हून अधिक हॉटेल्सना शटर बंद करण्याची वेळ आली असून अनेक ठिकाणी हॉटेल्स अर्धवट सुरू ठेवण्यात येत आहेत. ही परिस्थिती लवकर सुधारली नाही, तर उर्वरित हॉटेल्सही बंद करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गॅस टंचाईचा थेट परिणाम राज्य सरकारच्या ‘शिवभोजन थाळी’ योजनेवरही झाला आहे. गरीब आणि गरजू नागरिकांना कमी दरात जेवण उपलब्ध करून देणाऱ्या या केंद्रांमध्ये गॅसअभावी चपाती बनवणे कठीण झाले आहे. परिणामी अनेक केंद्रांवर भोजन थाळीतून चपाती गायब झाली असून ग्राहकांना केवळ भातावरच समाधान मानावे लागत आहे.
रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनच्या माहितीनुसार, ८ मार्चपासून जिल्ह्यात व्यावसायिक गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. मध्यम आकाराच्या हॉटेलला दररोज किंवा दोन दिवसाआड किमान एक सिलिंडर लागतो; मात्र गेल्या दोन आठवड्यांपासून पुरवठा थांबल्याने अनेक हॉटेल्सचे आर्थिक गणितच कोलमडले आहे.
पर्यायी उपायांचा आधार, पण खर्चात मोठी वाढ
गॅस उपलब्ध नसल्यामुळे अनेक हॉटेलचालकांनी सुरुवातीला पारंपरिक लाकडी चुलीवर स्वयंपाक सुरू केला. काहींनी इंडक्शन शेगड्या किंवा डिझेल भट्ट्यांचा पर्याय स्वीकारला; मात्र या पर्यायांमुळे खर्चात मोठी वाढ झाली आहे. वाढत्या खर्चामुळे अनेक लहान आणि मध्यम हॉटेल व्यवसायिकांना व्यवसाय चालवणे कठीण झाले आहे.
हॉटेलचालकांच्या मते, “व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी आम्ही विविध पर्याय वापरत आहोत; मात्र ते दीर्घकाळ शक्य नाही. गॅसशिवाय हॉटेल व्यवसाय चालवणे जवळपास अशक्य आहे.”
पर्यटन हंगामातच संकट
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही परीक्षांचा कालावधी संपताच रत्नागिरीत पर्यटन हंगामाला सुरुवात झाली आहे. समुद्रकिनारे, ऐतिहासिक स्थळे आणि कोकणी खाद्यसंस्कृतीचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक जिल्ह्यात दाखल होत आहेत. मात्र गॅसअभावी अनेक हॉटेल्स बंद किंवा मर्यादित स्वरूपात सुरू असल्याने पर्यटकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
हॉटेल व्यावसायिकांच्या मते, ही परिस्थिती कायम राहिल्यास रत्नागिरीच्या पर्यटन उद्योगावरही मोठा परिणाम होण्याची भीती आहे.
प्रशासनाकडे धाव
गॅस टंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांनी जिल्हा पुरवठा विभागाकडे वारंवार निवेदने दिली आहेत. दरम्यान, पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्तक्षेपानंतर काही दिवसांपूर्वी काही प्रमाणात सिलिंडरचा पुरवठा झाला होता; मात्र तो अपुरा ठरल्याने परिस्थिती पुन्हा गंभीर झाली आहे.
हॉटेल व्यावसायिकांनी प्रशासनाला तातडीने व्यावसायिक गॅसचा नियमित पुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे.
“सिलिंडर न मिळाल्यास हॉटेल बंद”
स्थानिक हॉटेल व्यावसायिक गणेश धुरी यांनी सांगितले की,
“आम्हाला व्यवसायासाठी एक किंवा दोन दिवसाआड सिलिंडर लागतो; मात्र ८ तारखेपासून एकही सिलिंडर मिळालेला नाही. शिवभोजन आम्ही सध्या चुलीवर करत आहोत. पालकमंत्री उदय सामंत यांनी यापूर्वी मदत केली; मात्र सोमवारपर्यंत सिलिंडर न मिळाल्यास हॉटेल बंद करण्याशिवाय पर्याय उरणार नाही.”
चुलीवर सुरू शिवभोजन
गॅसअभावी अनेक शिवभोजन केंद्रांवर लाकडी चुली पेटवून स्वयंपाक केला जात आहे. एका केंद्रावर दररोज साधारण १५० लोक जेवणासाठी येतात. मात्र गॅस नसल्यामुळे चपाती तयार करणे कठीण झाल्याने अनेक ठिकाणी फक्त भात आणि इतर पदार्थ देऊन नागरिकांची भूक भागवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
जर प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून गॅस पुरवठा सुरळीत केला नाही, तर रत्नागिरीतील हॉटेल व्यवसाय, पर्यटन आणि गरीबांसाठीची शिवभोजन योजना यांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


