रत्नागिरी प्रतिनिधी
रस्त्यावरून चालताना तसेच वाहन चालविताना रस्ता सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले. महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन आणि रस्ता सुरक्षा अभियानाच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभाग व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय ते मिरकरवाडा या मार्गावर रस्ता सुरक्षा रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी जिंदल यांनी विना हेल्मेट दुचाकी चालविणे, चुकीच्या बाजूने वाहन चालविणे, वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणे यामुळे अपघातांचे प्रमाण वाढते, याकडे लक्ष वेधले. पादचाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी वाहनचालकांनी घ्यावी. योग्य पद्धतीने वाहनतळ व्यवस्था वापरणे, वाहतुकीची शिस्त पाळणे हे रस्ता सुरक्षेचे महत्त्वाचे घटक असल्याचे त्यांनी सांगितले. कुटुंब, मित्रपरिवार आणि समाजात रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. हेल्मेट वापरल्याने स्वतःचेच नव्हे तर कुटुंबीयांचेही संरक्षण होते. नागरिकांनी रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करून अपघात टाळण्यासाठी सहकार्य करावे, असे त्यांनी नमूद केले.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी वाहन चालविताना शिस्त आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. दुचाकी चालविताना हेल्मेट, तर चारचाकी वाहन चालविताना सीटबेल्टचा वापर करावा. वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळावा, मद्यपान करून वाहन चालवू नये, तसेच अतिवेगाने वाहन चालविणे धोकादायक असल्याचे त्यांनी सांगितले. स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता जपण्याचा संकल्प करून रत्नागिरी अपघातमुक्त करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या रस्ता सुरक्षा रॅलीत पोलीस विभाग व उपप्रादेशिक परिवहन विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला.


