बुलढाणा प्रतिनिधी
शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी “माझं ३५ कोटींचं कमिशन मी कार्यकर्त्यांसाठी सोडलं” असं विधान केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या विधानानंतर राजकीय स्तरावर प्रतिक्रिया उमटू लागल्या असून गायकवाड यांनी नंतर याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
एका कार्यक्रमात बोलताना गायकवाड म्हणाले की, आपल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांना सक्षम करण्यासाठी आपण काम केले. “माझ्यासोबत सायकलवर फिरणारे कार्यकर्ते आज फॉर्च्युनरमधून फिरतात. जवळपास माझं ३५ कोटींचं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं,” असे ते म्हणाले. या विधानानंतर कमिशनबाबत त्यांनी उघड कबुली दिल्याची चर्चा सुरू झाली.
वाद निर्माण झाल्यानंतर गायकवाड यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, “माझ्या हाताला समस्या झाल्यापासून कधीकधी बोबडी वळते. मला ‘काम’ म्हणायचे होते; पण तोंडातून ‘कमिशन’ असा शब्द निघाला. मी कार्यकर्त्यांना ३५ कोटींची कामे दिली आहेत, असे म्हणायचे होते.” ठेकेदारांऐवजी कार्यकर्त्यांना कामे देण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, गायकवाड यांच्या उपस्थितीत बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात विविध पक्षांतील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केल्याचा कार्यक्रम पार पडला. या पक्षप्रवेशामुळे मतदारसंघातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची चर्चा सुरू आहे.
गायकवाड यांनी नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून पक्षाच्या विचारधारेनुसार जनतेची सेवा करण्याचे आवाहन केले.


