कोल्हापूर | प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध ज्योतिबा मंदिर परिसरात भाविकांना पुजाऱ्यांकडून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दर्शनासाठी मंदिरात आलेल्या दोन भाविकांवर काही पुजाऱ्यांनी अचानक हल्ला केला. सुमारे १५ ते २० पुजारी संबंधित भाविकांच्या अंगावर तुटून पडले आणि त्यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे तर एका भाविकाच्या डोक्यात नारळ फोडल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे. या घटनेमुळे मंदिर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
ही मारहाण नेमकी कोणत्या कारणावरून झाली, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. कोणत्या वादातून हा प्रकार घडला, याची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशी सुरू केली आहे. संबंधित पुजाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाविक आणि नागरिकांकडून केली जात आहे. मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.


