मुंबई प्रतिनिधी
मुंबई : वडाळा परिसरात दारूच्या वादातून पतीने पत्नीची मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
मृत महिलेचे नाव कविता महेश वाड असे असून आरोपी पती महेश नारायण वाड याने दारूच्या नशेत पत्नीवर निर्घृण मारहाण केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पती-पत्नीमध्ये वारंवार कौटुंबिक वाद होत असल्याचेही तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी आरोपी महेश हा दारूच्या नशेत घरी आला होता. त्यानंतर पती-पत्नीमध्ये दारू पिण्यावरून जोरदार वाद झाला. वादाच्या भरात महेशने कवितावर लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत कविता गंभीर जखमी झाली. मात्र जखमी अवस्थेत असतानाही आरोपीने तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले नाही.
दरम्यान, काही वेळाने कविता घरीच बेशुद्ध पडली. शेजाऱ्यांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात तिच्यावर गंभीर शारीरिक मारहाण झाल्याचे स्पष्ट झाले असून शरीरावर अनेक ठिकाणी जखमा आणि व्रण आढळून आले.
या प्रकरणी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


