लेख
दुष्काळी पट्ट्यातील बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील कुंड बुद्रूक या छोट्याशा गावातून मुंबईच्या कुर्ला पूर्व परिसरात स्थायिक झालेल्या राजू किसन झणके यांनी आपल्या जिद्दीने, परिश्रमाने आणि समाजसेवेच्या ध्यासाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. साधी राहणी आणि उंच विचारसरणी यांचा संगम असलेले झणके हे नाव आज पत्रकारिता आणि सामाजिक कार्याच्या क्षेत्रात आदराने घेतले जाते.

लहानपणापासूनच त्यांना संगीत, वक्तृत्व आणि नाटक यांची विशेष आवड होती. या विविध कलाक्षेत्रांत त्यांनी अनेक पारितोषिकेही पटकावली. लोकांशी जुळवून घेण्याची कला आणि दांडगा जनसंपर्क ही त्यांची खासियत ठरली. आयुष्यात अनेक नोकऱ्या त्यांनी केल्या; मात्र समाजसेवेची ओढ इतकी प्रबळ होती की त्या नोकऱ्यांमध्ये ते जास्त काळ रमू शकले नाहीत. समाजातील अन्याय-अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्याची जिद्द आणि लेखन-वाचनाची आवड यामुळेच त्यांनी सन २००० पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात पाऊल टाकले.

पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील वंचित, पीडित आणि दुर्लक्षित घटकांसाठी लढण्याचा निर्धार त्यांनी केला. एका सामान्य वार्ताहरापासून ते मंत्रालय प्रतिनिधीपर्यंतचा प्रवास त्यांनी आपल्या कष्टाने आणि प्रामाणिक कामगिरीने पूर्ण केला. गेल्या दोन दशकांहून अधिक काळात त्यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील असंख्य उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी “एक वही – एक पेन” हे अभियान सुरू केले. या उपक्रमामागचा उद्देश एकच- आर्थिक परिस्थितीमुळे एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये. या अभियानाच्या माध्यमातून राज्यभरातील गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पेन आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. त्यांच्या या उपक्रमाला महाराष्ट्रभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. अनेक दानशूर व्यक्तींनीही या अभियानाला हातभार लावला आणि ते महाराष्ट्रभर परिचित झाले.
कुर्ला परिसरात कार्य करताना झणके यांनी तळागाळातील लोकांशी घट्ट नातं निर्माण केलं. समाजातील विविध प्रश्नांसाठी ते नेहमीच पुढे सरसावले. पत्रकारितेसोबतच अनेक सामाजिक संघटनांमध्ये त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या. अनेक संस्थांशी त्यांचे घनिष्ठ संबंध असून विविध संघटनांमध्ये पदाधिकारी, कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे.
सन २००५ मध्ये ते भारतीय फेरीवाला एकता संघाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष होते. फेरीवाले, कामगार, गोरगरीब आणि गरजू घटकांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला. पत्रकारितेची जबाबदारी सांभाळताना समाजातील गरजू कुटुंबांना आणि विद्यार्थ्यांना मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. मुंबईपासून विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये त्यांनी “एक वही – एक पेन” हे अभियान राबवले.
त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना “समाजभूषण” पुरस्काराने गौरविले. तसेच महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने सन २०२४ मध्ये त्यांना प्रतिष्ठेचा “डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण” पुरस्कार देऊन सन्मानित केले. विशेष म्हणजे, हा सन्मान स्वतःपुरता न ठेवता त्यांनी तो चळवळीतील कार्यकर्त्यांना समर्पित केला आणि चैत्यभूमी येथे जाऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण करून आपल्या विचारनिष्ठतेची प्रचिती दिली.
मितभाषी, मनमिळावू आणि सर्वांना प्रोत्साहन देणारा त्यांचा स्वभाव हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. समोरच्या व्यक्तीला मार्गदर्शन करणे, प्रेरणा देणे आणि समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन चालण्याची वृत्ती यामुळे ते सर्वसमावेशक नेतृत्वाचे आदर्श ठरले आहेत. त्यांचे व्यक्तिमत्व बंडखोर असले तरी ते समाजहितासाठी झटणारे, प्रेरणादायी आणि विचारशील आहे.
स्वतःचा वाढदिवस साजरा करतानाही त्यांनी समाजभान जपले आहे. ५६ व्या वाढदिवसानिमित्त कुर्ला येथील संत गाडगे महाराज वसतीगृहातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून त्यांनी एक आदर्श निर्माण केला. त्यांच्या कृतीतून समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा अनेकांना मिळत आहे.
अशा या ध्येयवादी, प्रेरणादायी आणि समाजनिष्ठ व्यक्तिमत्वाला ५६ व्या वाढदिवसानिमित्त पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि समाजसेवेची अखंड प्रेरणा लाभो, हीच मनःपूर्वक सदिच्छा.
उमेश गायगवळे, मुंबई


