मुंबई प्रतिनिधी
इराणवर इस्रायल आणि अमेरिका यांनी केलेल्या हल्ल्यानंतर मध्यपूर्वेत निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीला आता पंधरा दिवस उलटले आहेत. या संघर्षाचे पडसाद जगभर उमटत असून भारतातही त्याचा परिणाम दिसू लागला आहे. इंधन टंचाईमुळे एलपीजी गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांसह हॉटेल व्यवसायिकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून काहींनी इंडक्शन किंवा इलेक्ट्रिक शेगड्यांचा वापर सुरू केला आहे. मात्र मोठे हॉटेल व्यवसायिक आणि खानावळींसाठी हा पर्याय पुरेसा ठरत नसल्याने अनेकांनी पुन्हा पारंपरिक चुलीकडे मोर्चा वळवला आहे.
शेणाच्या गोवऱ्यांना अचानक मोठी मागणी
जळगाव येथे गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्यानंतर गायी-म्हशीच्या शेणापासून बनणाऱ्या गोवऱ्यांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. घरगुती वापरासोबतच हॉटेल व्यवसायिकांकडूनही गोवऱ्यांना मोठी मागणी येत आहे.
सध्या महिलांच्या माध्यमातून दिवसभरात सुमारे ६०० ते ७०० गोवऱ्या तयार केल्या जात असून त्यापैकी किमान ५०० गोवऱ्यांची दररोज विक्री होत असल्याचे पशुपालक सांगतात. एक गोवरी ७ ते १० रुपयांना विकली जात असून काही ठिकाणी आगाऊ बुकिंग करूनही गोवऱ्या घेऊन जात असल्याचे चित्र आहे.
हॉटेलमध्ये सांबार बंद, मेन्यूत कपात
सोलापूर मधील प्रसिद्ध सुधा हॉटेल बाहेर ‘इडलीसोबत केवळ चटणी मिळेल, सांबार संपले आहे’ असा बोर्ड लावण्यात आला आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्यामुळे सांबार तयार करता येत नसल्याचे हॉटेल चालकांनी सांगितले. काही ठिकाणी चुलीवर स्वयंपाक सुरू केला असला तरी ग्राहकांना ही चव पसंत पडते का हे पाहण्याची वेळ हॉटेल मालकांवर आली आहे.
अनेक हॉटेल चुलीकडे
अहिल्यानगर तसेच इगतपुरी येथेही व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अनेक हॉटेल चालकांनी विटांच्या चुली बांधून स्वयंपाक सुरू केला आहे. काही ठिकाणी खर्च वाढल्याने हॉटेलच्या मेन्यूमध्येही कपात करण्यात आली असून काही व्यवसायिकांनी तात्पुरते हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
सिलिंडर चोरी आणि काळाबाजार
बुलढाणा येथील टीबी हॉस्पिटलच्या स्वयंपाकघरातून एका भरलेल्या गॅस सिलिंडरसह इतर साहित्य चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू आहे.
दरम्यान, मुंबईच्या वरळी परिसरात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघडकीस आला आहे. शिधावाटप विभागाने कारवाई करत निमेश जैन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एक आरोपी फरार आहे.
खाऊ गल्लीत खवय्यांचे हाल
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बाहेरील खाऊ गल्लीतही गॅस तुटवड्याचा मोठा परिणाम दिसत आहे. कमर्शियल गॅस उपलब्ध नसल्याने दुकानदारांना इलेक्ट्रिक शेगड्यांवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. काही दुकानदारांनी तर परिस्थितीमुळे गावी जाण्याचाही निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.
युद्धजन्य परिस्थिती आणि गॅस टंचाईमुळे राज्यातील सामान्य नागरिकांपासून हॉटेल व्यवसायिकांपर्यंत सर्वांनाच फटका बसत असून पारंपरिक चुली आणि शेणाच्या गोवऱ्यांचा वापर पुन्हा वाढताना दिसत आहे.


