मुंबई प्रतिनिधी
मुंबई महापालिकेच्या १७ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी तीन टप्प्यांत पार पडलेल्या निवडणुकीत महायुतीने स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ९ प्रभाग समित्यांवर विजय मिळवला असून शिवसेना (शिंदे) गटाच्या २ समित्या मिळाल्याने एकूण ११ प्रभाग समित्यांवर महायुतीचा ताबा आला आहे.
तर गेली सुमारे २५ वर्षे मुंबई महापालिकेच्या सत्तेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या शिवसेना (ठाकरे) गटाला केवळ २ प्रभाग समित्यांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसलाही २ समित्या मिळाल्या असून मनसे आणि एमआयएमला प्रत्येकी १ समिती मिळाली आहे.
या निवडणुकीचे कामकाज महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांनी पीठासीन अधिकारी म्हणून पार पाडले.
तीन प्रभाग समित्या हातातून निसटल्या
शिवसेना (ठाकरे) गटाला किमान तीन प्रभाग समित्या जिंकण्याची संधी असूनही ती गमवावी लागल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.
एफ/दक्षिण प्रभाग समितीच्या निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि काँग्रेसचे नगरसेवक गैरहजर राहिल्याने शिवसेनेच्या माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेविका श्रद्धा जाधव यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला. त्यामुळे ही समिती शिवसेनेच्या हातातून गेली.
तसेच सोमवारी पार पडलेल्या एस आणि टी प्रभाग समितीच्या निवडणुकीतही शिवसेना (ठाकरे) गटाला धक्का बसला. सत्ताधारी भाजप-शिवसेना (शिंदे) आणि विरोधी गट यांचे प्रत्येकी १० नगरसेवक असे समान संख्याबळ असताना शिवसेनेचे उमेदवार सुरेश शिंदे आणि नगरसेविका दीपमाला बढे यांनी भाजपच्या उमेदवार साक्षी दळवी यांच्या रकान्यात स्वाक्षरी केल्याने त्यांची दोन मते बाद ठरली. परिणामी साक्षी दळवी यांना १० तर प्रतिस्पर्धी उमेदवार शिंदे यांना ८ मते मिळाली आणि भाजपला या समितीवर विजय मिळाला.
जी/उत्तर प्रभाग समितीतही शिवसेना (ठाकरे) गटाकडे ११ पैकी ६ नगरसेवकांचे संख्याबळ असतानाही ऐनवेळी पक्षाने उमेदवार जोसेफ कोळी यांना माघार घ्यायला सांगितल्याने मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांची निवड बिनविरोध झाली. त्यामुळे आणखी एक समिती शिवसेनेच्या हातातून गेली.
अखेरच्या टप्प्यात भाजपचा जोर
१७ प्रभाग समित्यांपैकी पहिल्या १२ समित्यांच्या निवडणुकीत भाजपने ६ समित्या जिंकल्या होत्या. सोमवारी झालेल्या उर्वरित ५ समित्यांच्या निवडणुकीत भाजपने आणखी ३ समित्या आपल्या ताब्यात घेतल्या. तर शिवसेनेला १ आणि एमआयएमला १ समिती मिळाली.
एकूण निकालात भाजपने ९ समित्यांवर झेंडा फडकवत सर्वात मोठा पक्ष म्हणून आपले वर्चस्व सिद्ध केले. शिवसेना (शिंदे) गटाच्या २ समित्यांमुळे महायुतीचा आकडा ११ वर पोहोचला.
पालिका वर्तुळात मात्र शिवसेना (ठाकरे) गटाच्या अंतर्गत गोंधळामुळे किमान तीन प्रभाग समित्यांची संधी गमावल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीने आघाडी घेतली असली तरी विरोधी पक्षांच्या रणनितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


