पुणे प्रतिनिधी
पुणे : शिवाजीनगर परिसरात ऑनलाइन डिलिव्हरीसाठी आलेल्या डिलिव्हरी बॉयने तरुणीशी अनुचित वर्तन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पाण्याच्या बहाण्याने तरुणीची छेड काढल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शिवाजीनगर येथील एका तरुणीने ऑनलाइन ‘पोर्टर’ ॲपवरून काही सामान मागवले होते. डिलिव्हरी बॉय पार्सल घेऊन तिच्या घरी आला. तरुणीने दरवाजा उघडून पार्सल स्वीकारल्यानंतर आरोपीने तहान लागल्याचे सांगत पाण्याची मागणी केली.
तरुणीने पाणी दिल्यानंतर ग्लास घेताना आरोपीने तिच्या हाताला स्पर्श केला आणि “तू खूप सुंदर दिसतेस” असे म्हणत अनुचित वर्तन केले, अशी तक्रार करण्यात आली आहे. यावेळी घरात तरुणीचे बाळ आणि सासू उपस्थित होत्या.
घडलेला प्रकार तरुणीने तत्काळ पतीला सांगितला. त्यानंतर दोघांनीही थेट शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.
या प्रकरणी श्रीधर कांबळे (वय २७, रा. शुक्रवार पेठ, मूळ कराड) याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ॲपवरील माहिती तसेच सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले असून आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


