मुंबई प्रतिनिधी
मुंबई : राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या नावाने बनावट नोटीस पाठवून ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाकडून तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी किशन मकवाना (३५) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोरेगाव येथील ७७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला नोव्हेंबर २०२५ मध्ये दोन जणांनी स्वतःला पोलिस अधिकारी असल्याचे सांगत दूरध्वनीवर संपर्क साधला. तुमच्या आधार कार्डाचा वापर करून जम्मू-काश्मीरमध्ये बँक खाते उघडण्यात आले असून त्या खात्यात दहशतवादाशी संबंधित व्यवहार झाल्याचा दावा करण्यात आला. तपासात सहकार्य न केल्यास अटक केली जाईल, अशी धमकीही देण्यात आली. तसेच व्हॉट्सअॅपवर बनावट अटक वॉरंट पाठवण्यात आले.
१८ नोव्हेंबर ते ३ डिसेंबरदरम्यान आरोपींनी वारंवार संपर्क साधत तपासातून सुटका करून देण्याच्या नावाखाली पैसे भरण्याची मागणी केली. भीतीपोटी ज्येष्ठ नागरिकांनी आरोपींनी सांगितलेल्या विविध बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने एकूण २.२५ कोटी रुपये वर्ग केले. पैसे पाठवल्यानंतर आरोपींचे संपर्क क्रमांक बंद झाल्याने फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.
तपासात आरोपी किशन मकवाना हा सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पोलीस महासंचालकांच्या नावाने ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवत फसवणूक करण्याची ही चौथी घटना असून या संदर्भातील सर्व प्रकरणांचा तपास सुरू आहे.


