सांगली प्रतिनिधी
क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीत तीन महिन्यांत रक्कम दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या मिरजेतील डॉक्टर दाम्पत्याच्या आलिशान बंगल्यावर पोलिसांनी नुकतीच छापेमारी केली. या कारवाईत काही महत्त्वाची कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक साधने आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
मिरजेतील गुरुवार पेठ, छलवादी गल्ली येथील डॉ. इब्राहिम महंमदसाब नायकवडी-इनामदार (वय ५१) आणि त्यांची पत्नी जास्मिन इब्राहिम नायकवडी-इनामदार (वय ४१) यांना काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली. यापूर्वी या प्रकरणात इब्राहिम यांचा भाऊ अब्दुलमहंमदसाब नायकवडी यालाही अटक करण्यात आली होती.
इचलकरंजी येथील सादिक कोचरगी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात या तिघांनी क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली तब्बल २ कोटी १५ लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित दाम्पत्याने गुंतवणूकदारांना आकर्षक परताव्याचे आश्वासन देत मोठ्या प्रमाणावर रक्कम गोळा केली. सुरुवातीला काहींना परतावा दिल्यानंतर अधिक गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले. मात्र नंतर व्यवहार थांबवून संपर्क टाळण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघेही पोलिसांना चकवा देत होते.
दरम्यान, मिरजेतील त्यांच्या आलिशान बंगल्यावर टाकलेल्या छाप्यात आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे, मोबाईल फोन, संगणक संच आणि बँक व्यवहारांची माहिती जप्त करण्यात आली. जप्त साहित्याच्या आधारे आर्थिक प्रवाहाचा मागोवा घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
अटक करण्यात आलेल्या दाम्पत्याला न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी गुंतवणूकदार पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, तपास यंत्रणा आर्थिक गुन्हे शाखेच्या मदतीने अधिक खोलवर चौकशी करत आहे.
क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून अल्पावधीत मोठा परतावा देण्याच्या आमिषांना बळी पडू नये, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.


