मुंबई प्रतिनिधी
मध्यपूर्वेतील वाढत्या युद्धजन्य तणावाचा फटका देशातील आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीला बसू लागला असून मुंबई विमानतळावरील परदेशगामी उड्डाणांमध्ये मोठ्या प्रमाणावर खंड पडला आहे. रविवारी (१ मार्च) दुपारी अडीचपर्यंत मुंबईहून सुटणारी तब्बल १२५ आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली. परिणामी शेकडो प्रवासी, विद्यार्थी, पर्यटक तसेच खेळाडू विमानतळावर अडकून पडले असून गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
मध्यपूर्वेत इस्राईल, अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष तीव्र झाल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव आखाती देशांनी आपले हवाई क्षेत्र तात्पुरते बंद केले. यामुळे युरोप व उत्तर अमेरिकेकडे जाणाऱ्या मार्गांवर परिणाम झाला असून अनेक उड्डाणे लांबणीवर टाकावी लागली किंवा रद्द करावी लागली, असे विमानतळ सूत्रांनी सांगितले.
एअर इंडियाने मुंबईहून लंडन, न्यूयॉर्क, शिकागो, टोरंटो, फ्रँकफर्ट आणि पॅरिसकडे जाणारी रविवार व सोमवारची सर्व उड्डाणे रद्द केली. दिल्लीहून तेल अवीवकडे निघालेले एक विमान सुरक्षेच्या कारणास्तव मध्यावरून परत मुंबईकडे वळवण्यात आले. इंडिगोनेही पश्चिम आशियातील सेवा तात्पुरती स्थगित केली असून मुंबई-लंडन मार्गावर परिणाम झाला आहे.
अचानक कोलमडलेल्या हवाई वाहतुकीमुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विमान कंपन्यांकडून तिकिट परतावा अथवा पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी संघर्ष दीर्घकाळ चालल्यास आंतरराष्ट्रीय विमानभाड्यात मोठी वाढ होण्याची तसेच हवाई सेवा दीर्घकाळ विस्कळीत राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


