नागपूर प्रतिनिधी
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील राऊळगाव येथे रविवारी सकाळी स्फोटक निर्मिती करणाऱ्या एसबीएल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात सर्वच कामगार मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत १६ जळालेले मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले असून घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. स्फोटावेळी सुमारे ३५ कामगार उपस्थित असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
प्राथमिक माहितीनुसार सकाळी सहा ते सात वाजण्याच्या सुमारास डिटोनेटर निर्मिती प्रक्रियेदरम्यान अचानक मोठा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की संबंधित युनिटचा काही भाग कोसळल्याचे सांगण्यात येते. प्रचंड धुराचे लोट आकाशात झेपावले असून आवाज दूरवर ऐकू आल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली. स्फोटानंतर लागलेल्या आगीमुळे आणि ढिगाऱ्याखाली काही कामगार अडकल्याची भीती आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि जिल्हा प्रशासनाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे आणि अडकलेल्या कामगारांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून स्फोटाचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे. स्फोटक हाताळणीसंबंधी सुरक्षाविषयक नियमांचे पालन झाले होते का, याचाही तपास केला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, जखमी कामगारांच्या नातेवाइकांनी रुग्णालयांकडे धाव घेतली असून अधिकृत माहितीची प्रतीक्षा सुरू आहे. भीषण स्फोटामुळे राऊळगाव व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या घटनेमुळे स्फोटक कारखान्यांमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


