हिंगोली प्रतिनिधी
एक लाख रुपयांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात अडीच लाख रुपयांच्या बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवून व्यवहार करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केली. हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका शिवारातील राष्ट्रीय महामार्गावरील गोरेगाव टी-पॉइंटजवळ बुधवारी (२५ फेब्रुवारी) रात्री १० ते ११ वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणातून बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील लिंगापूर येथील अंतेश्वर भुसारे यांना खामगाव येथील लखन बजाज व विजय ठाकूर यांनी एक लाख रुपयांच्या बदल्यात अडीच लाख रुपयांच्या बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवले होते. त्यानुसार कनेरगाव नाका येथील उड्डाणपुलाखाली येण्यास सांगण्यात आले. बुधवारी रात्री भुसारे तेथे पोहोचल्यावर आरोपींनी कारमध्येच व्यवहाराची चर्चा सुरू केली.
दरम्यान, या संशयास्पद हालचालीची माहिती पोलिसांना आधीच मिळाल्याने बासंबा पोलिस चौकीचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांचे वाहन दिसताच आरोपींनी कारने पळ काढत प्रथम वाशीमकडे आणि त्यानंतर चिंचपुरीच्या दिशेने धाव घेतली. पोलिसांनी पाठलाग करून चिंचपुरीजवळ दोघांना अटक केली.
आरोपींकडून चार मोबाईल, ‘भारतीय बच्चोंकी बँक’ असा उल्लेख असलेल्या बनावट नोटांचे बंडल, रोख एक लाख रुपये आणि एक चारचाकी वाहन असा एकूण १३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान, अंतेश्वर भुसारे यांच्या फिर्यादीवरून बासंबा पोलिस चौकीत लखन बजाज व विजय ठाकूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी यापूर्वीही नांदेड जिल्ह्यातील लिंगापूर परिसरातील काही नागरिकांची बनावट नोटा देऊन फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित रॅकेटचा तपास सुरू असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


