स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई: साकीनाका पोलीस ठाण्याच्या पथकाने मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका सराईत आंतरराज्य टोळीचा छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी २३ लाख ८९ हजार रुपये किमतीच्या एकूण ११ स्पोर्ट्स बाईक हस्तगत केल्या असून, यामुळे मुंबई शहर आणि उपनगरातील चोरीचे तब्बल १५ गुन्हे उघडकीस आले आहेत.
या प्रकरणाची अधिक माहिती अशी की, २२ नोव्हेंबर २०२५ रोजी साकीनाका येथील अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवर उभी केलेली एक महागडी ‘रॉयल इनफिल्ड इंटरसेप्टर ६५०’ चोरीला गेली होती. याप्रकरणी साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन चोरी विरोधी पथक आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक तपास सुरू केला. गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी प्रथम मिराज उर्फ बवाल मोहम्मद रईस खान (वय २६, रा. ठाणे, मूळ रा. उत्तर प्रदेश) याला दहिसर मोरी, ठाणे येथून शिताफीने ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता, या गुन्ह्यात राजस्थानच्या अजमेर येथील उमेर आमीन शेख (वय २०, रा. धुळे) याचा सहभाग असल्याचे समोर आले. पोलिसांनी तातडीने अजमेर गाठून उमेर यालाही अटक केली.
तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की, मिराज खान हा दुचाकींची चोरी करायचा आणि त्या उमेर शेख याला विकायचा. त्यांच्याकडून रॉयल इनफिल्ड आणि यामाहा कंपनीच्या ११ महागड्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे साकीनाका पोलीस ठाण्यातील १० गुन्ह्यांसह व्ही.बी.नगर, कुर्ला, सायन आणि धारावी पोलीस ठाण्यांमधील ५ गुन्हे, असे एकूण १५ गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही यशस्वी कामगिरी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (का. व सु.) सत्यनारायण, अपर पोलीस आयुक्त परमजित सिंह दहिया, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ-१०) दत्ता नलावडे आणि साकीनाका विभागाचे सहायक पोलीस आयुक्त प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील यादव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नितीन पाटील यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शिरसाट, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी राजेंद्र नांगरे, पोलीस उपनिरीक्षक सुहास कांदे, पोलीस उपनिरीक्षक अजित लोणकर तसेच पोलीस हवालदार गांजाळे, पवार, सौदरमल, भिंगावडे, विशाल पिसाळ (तांत्रिक मदत) आणि पोलीस शिपाई जाधव, अर्जुन, थोरात, ढगे व बागलाने यांचा समावेश होता. या सर्व पथकाच्या कौतुकास्पद कामगिरीमुळे वाहन चोरांच्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.


