चंदीगड :
हरियाणा सरकारच्या विभागीय खात्यांमधील तब्बल सुमारे ५९० कोटींची रक्कम अपहार करून ती कुटुंबीयांच्या कंपनीमार्फत वळविल्याचा मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. या प्रकरणी IDFC First Bank च्या चंदीगड शाखेचे माजी व्यवस्थापक रिभव ऋषी याच्यासह चौघांना हरियाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अटक केली आहे. आरोपींमध्ये माजी रिलेशनशिप मॅनेजर अभय, ऋषीची पत्नी स्वाती सिंगला व तिचा भाऊ अभिषेक सिंगला यांचा समावेश आहे.
खात्यांतील तफावत तपासात उघड
हरियाणा सरकारच्या एका विभागाने संबंधित खाते बंद करून शिल्लक रक्कम अन्य बँकेत वर्ग करण्याची विनंती केली असता हा गैरप्रकार समोर आला. बँकेच्या पडताळणीत कागदोपत्री रक्कम आणि प्रत्यक्ष खात्यातील शिल्लक यामध्ये मोठी तफावत आढळली. त्यानंतर इतर शासकीय संलग्न खात्यांची तपासणी करण्यात आली असता अशाच प्रकारचे अनियमित व्यवहार झाल्याचे लक्षात आले. बँकेने तातडीने नियामक संस्था व तपास यंत्रणांना माहिती दिली.
कुटुंबीयांच्या कंपनीत निधी वळवला
तपासात असे निष्पन्न झाले की, ऋषी व अभय यांनी सुमारे सहा महिन्यांपूर्वीच नोकरीचा राजीनामा दिल्यानंतरही खात्यांवरील नियंत्रणाचा गैरफायदा घेतला. हरियाणा सरकारच्या खात्यांतील रक्कम ‘स्वास्तिक देश प्रोजेक्ट्स’ या कंपनीच्या खात्यात वळविण्यात आली. ही कंपनी स्वाती सिंगला (७५%) व अभिषेक सिंगला (२५%) यांच्या मालकीची आहे. या मार्गाने सुमारे ₹३०० कोटींचा निधी पुढे इतरत्र हस्तांतरित करण्यात आल्याचे तपासात आढळले. व्यवहार मोहाली येथील AU Small Finance Bank शाखेत वळवून राज्यसीमा बदलाचा फायदा घेत लपविण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय आहे.
बँकेने भरपाई केली
प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही बँकेने हरियाणा सरकारच्या विभागांचे नुकसान होऊ दिले नाही. ‘कस्टमर फर्स्ट’ धोरणानुसार दावा केलेली संपूर्ण रक्कम व्याजासह सुमारे ५८३ कोटी परत केल्याचे बँकेने निवेदनात म्हटले आहे. या तत्परतेबद्दल हरियाणा सरकारने बँकेचे कौतुक केले आहे.
पुढील तपास
मुख्य आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असून या घोटाळ्यात आणखी कोणाचे संगनमत होते का, याचा तपास ACB करीत आहे. बँकिंग व्यवहारांतील नियंत्रण व देखरेखीबाबत गंभीर प्रश्न या प्रकरणामुळे पुन्हा ऐरणीवर आले आहेत.


