नवी मुंबई प्रतिनिधी
नवी मुंबईच्या कोपरखैरणे परिसरात रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक आणि तेवढीच लाजीरवाणी घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीने त्याच्या दोन अल्पवयीन मुलींना पैशासाठी वेश्या व्यवसायात ढकलले आहे.
एका दलालामार्फत तो त्याच्या मुलींना वेगवेगळ्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत होता. या प्रकरणी पोलिसांनी छापेमारी करत दोन्ही मुलींची सुटका केली आहे. पोलिसांनी आरोपी दलालाला अटक केली आहे. तर मुलींचा सौदा करणारा आरोपी वडील फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
नवी मुंबईच्या बेलापूर परिसरात काही अल्पवयीन मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची गुप्त माहिती नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापेमारी केली. तेव्हा १६ आणि १४ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी कसून तपास केला असता यामागे याच मुलींचा नराधम बाप असल्याचे उघड झाले आहे.
नवी मुंबईतील कोपरखैरणेमध्ये राहणारा हा नराधम बाप पोटच्या मुलींचा पैशांसाठी सौदा करत होता. त्याने दीड लाखाला मुलीचा सौदा केला होता. त्यातील सव्वा लाख त्याला मिळाले तर २५ हजार रुपये दलालाला देण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा (PITA) आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या दलाल पोलिसांच्या कोठडीत असून, नराधम पिता फरार आहे. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.


