मुंबई, प्रतिनिधी
विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने जागतिक ज्ञानसंपदेकडे थेट प्रवेश देणारे देशातील पहिले ‘एआय डिजिटल ग्रंथालय’ मंगळवारी (२४ फेब्रुवारी) लालबाग येथे सुरू होणार आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेले हे अत्याधुनिक ज्ञानकेंद्र स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसह सर्वसामान्यांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.
लालबागमधील ‘पेरू चाळ’ परिसरातील ‘लालबागचा राजा प्रबोधिनी’ येथे सायंकाळी ७ वाजता ग्रंथालयाचे लोकार्पण ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ व लेखक डॉ. अच्युत गोडबोले यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी, माजी महापौर किशोरी पेडणेकर तसेच स्थानिक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हे ग्रंथालय पारंपरिक पुस्तकसंग्रहापुरते मर्यादित नसून एआय-आधारित शोध, विषयानुसार संदर्भसामग्री, ई-पुस्तके, डिजिटल नोट्स आणि अभ्याससाधने यांचा एकात्मिक संच उपलब्ध करून देणार आहे. विद्यार्थ्यांना हवी असलेली माहिती जलद आणि अचूक पद्धतीने मिळावी, तसेच जागतिक दर्जाच्या शैक्षणिक साधनांपर्यंत सहज पोहोच व्हावी, हा उपक्रमामागील उद्देश असल्याचे मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी सांगितले.
गेल्या नऊ दशकांपासून शैक्षणिक, वैद्यकीय व सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या मंडळाने रुग्णवाहिका सेवा, डायलिसिस केंद्र, शिष्यवृत्ती योजना आणि आपत्तीग्रस्तांना मदत अशा कार्यांनंतर शिक्षणक्षेत्रात डिजिटल झेप घेतली आहे. ‘डिजिटल युगात मुंबईतील विद्यार्थी मागे पडू नयेत, यासाठी हे ज्ञानकेंद्र महत्त्वाचे ठरेल,’ असा विश्वास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या ऐतिहासिक उपक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मानद सचिव सुधीर साळवी व खजिनदार मंगेश दळवी यांनी केले आहे.


