मध्य प्रदेश:
मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील सांवगा येथे गुरुवार-शुक्रवारच्या मध्यरात्री एका युवकाने अमानुषतेची परिसीमा ओलांडत आई-वडील व लहान भावाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. आरोपीने घरातील पाच वर्षीय भाच्यावरही हल्ला करून गंभीर जखमी केले असून पाळीव मांजरीलाही ठार मारल्याचे समोर आले आहे. घटनेनंतर आरोपी रात्रभर मृतदेहांजवळच बसून राहिल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सांवगा गावात राहणारा दीपक धुर्वे (वय अंदाजे २२) याने आई कमलती धुर्वे, वडील राजू धुर्वे व भाऊ दिलीप धुर्वे यांच्यावर लाठी अथवा लोखंडी रॉडने हल्ला केला. डोक्यावर व शरीरावर झालेल्या जबर मारहाणीमुळे तिघांचा जागीच मृत्यू झाला. घरात उपस्थित असलेला विजय (५) हा भाचा देखील हल्ल्याचा बळी ठरला; मात्र तो लपल्याने त्याचा जीव वाचला. त्याच्या अंगावर मारहाणीचे स्पष्ट निशाण आढळले.
घटनेचा उलगडा शुक्रवारी सकाळी झाला. गावातील एक व्यक्ती काही कामानिमित्त घराजवळ गेली असता आत रक्ताने माखलेले मृतदेह दिसल्याने त्याने तत्काळ पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा उघडला असता तिन्ही मृतदेह घरात पडलेले आणि आरोपीही तेथेच बसलेला आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून शस्त्र जप्त केले आहे.
स्थानिक माहितीनुसार दीपक धुर्वे हा बारावी परीक्षेत अव्वल ठरलेला व गेली काही वर्षे शासकीय नोकरीच्या तयारीत गुंतलेला होता. निवड न झाल्याने तो मानसिक तणावाखाली होता, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. पोलिसांनी त्याच्या मानसिक स्थितीचा तपास सुरू केला असून प्राथमिक चौकशीत वैयक्तिक ताण-तणावातून गुन्हा घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेने सांवगा गावात शोककळा पसरली असून ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.


