सिन्नर प्रतिनिधी
मुंबई–आग्रा महामार्गावर वाहनचालकांना लक्ष्य करून लुटमार करणाऱ्या आंतरराज्य दरोडा टोळीचा सिन्नर पोलिसांनी थरारक पर्दाफाश केला आहे. वाडीवऱ्हे परिसरातील अलीकडील लुटीप्रकरणी तपास करताना सिन्नर तालुक्यातील मनेगाव शिवारात सापळा रचून दहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले, तर या टोळीचे दोन प्रमुख सदस्य थेट केरळ राज्यातून अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
छाप्यात संशयितांकडून तीन कार, धारदार शस्त्रास्त्रे आणि अन्य साहित्य असा सुमारे १९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या धडाकेबाज कारवाईमुळे महामार्गावरील प्रवाशांमध्ये दिलासा व्यक्त होत असून, जिल्ह्यातील महामार्ग सुरक्षेबाबत पोलिसांच्या दक्षतेचेही दर्शन घडले आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अप्पर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र मगर, सिन्नर पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमंतकुमार भामरे, वाडीवऱ्हेचे निरीक्षक भगवान मथुरे, सहाय्यक निरीक्षक नितीन रणदिवे, उपनिरीक्षक सुदर्शन बोडके, शैलेश टील, रूपाली चव्हाण यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.
आंतरराज्य जाळ्याचा उलगडा
प्राथमिक तपासात उघड झाले, की ही टोळी केरळमधील सराईत गुन्हेगारांची असून महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील महामार्गांवर लूटमार करत होती. वाहन आडवे लावून मार्ग अडवणे, चालकांना धमकावणे आणि रोख रक्कम अथवा मौल्यवान वस्तू लुटणे, ही टोळीची कार्यपद्धती असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, टोळीतील काही आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत. या टोळीशी संबंधित इतर गुन्ह्यांचाही तपास सुरू असून, पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक उलगडे होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.


