सातारा प्रतिनिधी
‘लोक काय म्हणतील’ या भीतीवर मात करत माण तालुक्यातील कासारवाडी येथील २१ विवाहित महिलांनी आयुष्यातील शैक्षणिक स्वप्न पुन्हा उचलून धरले असून त्यांनी शुक्रवारी दहावीच्या परीक्षेचा पहिला पेपर दिला. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांपासून प्रशासनापर्यंत सर्वांनी दिलेल्या सहकार्यामुळे शिक्षणासाठी उभ्या राहिलेल्या या ‘दुसऱ्या इनिंग’ची जिल्ह्यात सर्वत्र चर्चा होत आहे.
घर-संसारात रममाण झालेल्या महिलांनी अनेक वर्षांनंतर पुन्हा शालेय शिक्षणाच्या प्रवाहात परतण्याचा घेतलेला निर्णय हा सामाजिक बंधनांवर मात करणारा ठरला आहे. कासारवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच छाया सस्ते यांच्यासह एकूण २५ महिलांनी दहावीची परीक्षा देण्याचा निर्धार केला होता. त्यापैकी २१ महिला मराठी विषयाच्या पहिल्या पेपरला प्रत्यक्ष उपस्थित राहिल्या.
या उपक्रमाची प्रेरणा सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या भेटीतून मिळाली. डिसेंबरमध्ये कासारवाडी येथे ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी उपस्थित महिलांना “तुमच्यापैकी किती जणी दहावी उत्तीर्ण आहेत?” असा प्रश्न विचारला होता. त्यावर अनेकांनी शिक्षण अपूर्ण राहिल्याचे सांगितल्याने त्यांनी चालू वर्षी परीक्षा देण्याचे आवाहन केले. महिलांनी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
त्यानंतर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात २५ विवाहित महिला दहावी उत्तीर्ण नसल्याचे स्पष्ट झाले. माण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे व गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे यांनी विलंब शुल्कासह ‘१७ क्रमांकाचा फॉर्म’ भरून देण्याची प्रक्रिया सुलभ केली. महिलांच्या परीक्षा शुल्कापैकी ५० टक्के रक्कम पंचायत समितीच्या सेस निधीतून, तर उर्वरित ५० टक्के लोकसहभागातून उभी करण्यात आली. सरपंच छाया सस्ते यांनी स्वतः २० हजार रुपयांचे योगदान देत उपक्रमाला बळ दिले.
विवाहित असल्यामुळे कागदपत्रांची पडताळणी, प्रतिज्ञापत्रे, नावनोंदणी व प्रशासकीय समन्वय ही प्रक्रिया जिकिरीची होती; मात्र प्रशासनाने नियोजनपूर्वक सर्व बाबी पूर्ण करून महिलांना परीक्षेला बसवले. अनेक महिलांच्या मुलांनी किंवा नातवंडांनी याच काळात शालेय शिक्षण घेत असताना त्यांनी स्वतः परीक्षेला बसण्याचा घेतलेला निर्णय प्रेरणादायी ठरला आहे.
“मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. लोक काय म्हणतील ही लाज बाजूला ठेवणे हे मोठे आव्हान होते. मात्र ते स्वीकारून आम्ही आत्मविश्वासाने पेपर देत आहोत. या परीक्षेत आम्ही निश्चित यशस्वी होऊ,” असे सरपंच छाया सस्ते यांनी सांगितले.
ग्रामीण भागात प्रौढ शिक्षणाला नवे बळ देणाऱ्या या उपक्रमामुळे कासारवाडीतील महिलांनी ‘शिक्षणासाठी वयाची अट नसते’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिला आहे. जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहकार्याने उभ्या राहिलेल्या या प्रयत्नाचे शिक्षण क्षेत्रात स्वागत होत आहे.


