मुंबई प्रतिनिधी
महानगरपालिका निवडणुकीनंतर राज्य प्रशासनात पुन्हा एकदा अधिकाऱ्यांच्या बदली-नियुक्त्यांची हालचाल सुरू झाली असून, दोन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या पदांवर नियुक्त करण्यात आले आहे. राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त असलेले राजेश नार्वेकर यांची मुंबईचे परिवहन आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (TRTI) पुणेचे आयुक्त समीर कुर्तकोटी यांची मुंबईतील फी नियंत्रण प्राधिकरणाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राजेश नार्वेकर यांनी ५ ऑक्टोबर २०२४ रोजी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला होता. औषध नियंत्रण, अन्न सुरक्षा आणि औषध उद्योगाशी संबंधित धोरणात्मक निर्णयांमध्ये त्यांनी सक्रिय भूमिका बजावली. आता मुंबईतील वाहतूक व्यवस्थापनासमोरील वाढती आव्हाने लक्षात घेता त्यांची परिवहन आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील वाढती वाहनसंख्या, वाहतूक कोंडी आणि अंमलबजावणीतील सुधारणांची गरज या पार्श्वभूमीवर नार्वेकर यांच्याकडून प्रशासकीय कडकाई आणि तांत्रिक उपाययोजनांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
२०१३ बॅचचे महाराष्ट्र कॅडरमधील आयएएस अधिकारी समीर कुर्तकोटी हे फेब्रुवारी २०२५ पासून पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यापूर्वी ते मुंबईत राज्य कर विभागात सहआयुक्त होते. आता त्यांची फी नियंत्रण प्राधिकरणाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. खासगी शैक्षणिक संस्थांच्या शुल्करचनेचे परीक्षण, पारदर्शकता आणि तक्रारनिवारण यंत्रणा बळकट करणे या दृष्टीने या पदाला विशेष महत्त्व आहे.
कुर्तकोटी यांनी यापूर्वी बुलढाणा व भंडारा जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना ग्रामीण विकास, स्वच्छ भारत अभियान, जलसंधारण आणि स्थानिक पायाभूत सुविधा उभारणीवर भर दिला होता. ग्रामीण भागातील शिक्षण-आरोग्य सुविधा सुधारण्यासोबतच जिल्हा परिषद प्रशासनात डिजिटल प्रणालींचा वापर वाढवण्याचे उपक्रम त्यांनी राबवले. राज्य कर विभागात कार्यरत असताना महसूल संकलन आणि करप्रशासनातील प्रक्रियात्मक गुंतागुंत कमी करण्यासाठी तांत्रिक उपाययोजना राबवण्यावर त्यांनी भर दिला होता.
महानगरपालिका निवडणुकीपूर्वी राज्यात काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या, तर निवडणुकीनंतर काहींना पदोन्नती देण्यात आली आणि काही अधिकारी निवृत्त झाले. त्या पार्श्वभूमीवर या नव्या नियुक्त्यांकडे प्रशासनातील फेरबदलांचा पुढील टप्पा म्हणून पाहिले जात आहे. मुंबईतील वाहतूक व्यवस्थापन आणि शिक्षण शुल्क नियंत्रण या दोन्ही क्षेत्रांवर या नियुक्त्यांचा परिणाम होणार असल्याचे प्रशासनातील सूत्रांनी सांगितले.


