मुंबई प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून पक्षांतर्गत हालचालींना पुन्हा वेग आला असून, सुनेत्रा पवार यांच्या नावाभोवती सहमती असल्याचा दावा होत असतानाच आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे नवे राजकीय संकेत मिळू लागले आहेत. सुनेत्रा पवार अध्यक्ष व्हाव्यात यासाठी केवळ ३५ आमदारांनीच सह्या केल्याचा दावा करत इतर आमदारांनी सह्या का केल्या नाहीत, असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला.
सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदासंदर्भात पक्षात एकमत असल्याचे अधिकृतरीत्या सांगितले जात असताना, सह्यांची मर्यादित संख्या सूचित करणारा रोहित पवारांचा दावा महत्त्वाचा मानला जात आहे. अध्यक्षपदाच्या निवडीच्या प्रक्रियेबाबत स्पष्टता नसल्याने पक्षातील गटसंतुलनाबाबतही चर्चा सुरू झाल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, रोहित पवार यांच्या वक्तव्यावर पक्षातील इतर नेत्यांनी प्रतिवाद केला. सर्व आमदारांचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा असल्याने सह्यांचा प्रश्नच उद्भवत नाही, असे मत व्यक्त करत आनंद परांजपे यांनी रोहित पवारांवर पलटवार केला. अध्यक्षपदासाठी स्वतंत्र सह्या घेण्याची औपचारिक प्रक्रिया नसल्याचाही दावा त्यांनी केला.
पक्षातील सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईत १६ तारखेला झालेल्या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावावर सहमती दर्शविण्यात आली आहे. २६ तारखेला होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीत त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी केलेल्या दाव्याचा रोख नेमका कोणत्या गटाकडे आहे, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाच्या नेतृत्वाबाबत निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याच्या प्रक्रियेत सुनेत्रा पवार यांचे नाव पुढे आले. मात्र, सह्यांबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नामुळे पक्षांतर्गत मतैक्याच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे निरीक्षण व्यक्त केले जात आहे.
पक्षाच्या आगामी बैठकीत या विषयावर अधिकृत भूमिका स्पष्ट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


