मुंबई प्रतिनिधी
मुंबई उपनगरी रेल्वेच्या डब्यांत नोकरी, प्रेमविवाह, पती-पत्नीतील वाद, काळी जादू, न्यायालयीन प्रकरणे अशा कोणत्याही अडचणींवर ‘१०० टक्के हमीने उपाय’ करण्याचा दावा करणाऱ्या ‘बाबा बंगाली’ला रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) अटक केली. रेल्वे प्रशासनाची परवानगी न घेता डबे व परिसरात मोठ्या प्रमाणावर जाहिराती चिकटवून प्रवाशांची दिशाभूल केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. आरोपीकडून सुमारे १५ हजार छापील पोस्टर्स जप्त करण्यात आली असून वडाळा रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मध्य व पश्चिम रेल्वेच्या संयुक्त पथकाने रे रोड परिसरात मोहम्मद नझीर अंदारी हा ‘बाबा बंगाली’ नावाने भोंदूगिरी करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर दारुखाना येथील मीरा-१ अली दर्गा परिसरात छापा टाकून मंगळवारी ही कारवाई केली. चौकशीत आरोपीने व्यावसायिक हेतूने रेल्वे डब्यांत व स्थानक परिसरात बेकायदा जाहिराती चिकटविल्याची कबुली दिली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या जाहिरातींमधील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधणाऱ्यांकडून विविध ‘उपाय’ व विधींच्या नावाखाली पैसे उकळले जात असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. पोस्टर्स छापणे व चिकटविणे या कामात अन्य व्यक्तींचा सहभाग असल्याची शक्यता व्यक्त होत असून त्यांचा शोध सुरू आहे.
दरम्यान, रेल्वे प्रशासन व पोलीसांनी प्रवाशांना अशा भ्रामक जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. वैयक्तिक किंवा कौटुंबिक अडचणींसाठी अधिकृत व प्रशिक्षित समुपदेशक किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले. अशा फसवणुकीत गमावलेली रक्कम परत मिळवणे कठीण ठरते, याचीही नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.


