मुंबई, प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या १७ फेब्रुवारीच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेची कडक आखणी करण्यात आली आहे. सकाळी ८ ते रात्री ९ या १३ तासांच्या कालावधीत वाकोला उड्डाणपूल ते दहिसर टोल नाका दरम्यानच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर (WEH) सर्व अवजड वाहनांना प्रवेशबंदी असेल, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.
मुंबईच्या नव्याने निवड झालेल्या महापौर रितू तावडे या प्रोटोकॉलनुसार विमानतळावर दोन्ही नेत्यांचे स्वागत करणार असून, चार वर्षांनंतर महापौर पदावरून राष्ट्रप्रमुखांच्या स्वागताची परंपरा पुन्हा सुरू होत आहे.
अवजड वाहनांना पर्यायी मार्गांचा सल्ला
व्हीव्हीआयपी हालचाली लक्षात घेता, पश्चिम उपनगरातून शहराकडे येणाऱ्या अवजड वाहनांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र रुग्णवाहिका, अग्निशमन दल आदी आपत्कालीन सेवांना निर्बंधांतून सूट देण्यात आली आहे.
द्विपक्षीय सहकार्यास चालना
दोन्ही नेते मुंबईतील लोकभवन येथे ‘क्षितिज २०४७’ रोडमॅपअंतर्गत संरक्षण-सुरक्षा विषयांवर चर्चा करणार असून ‘भारत-फ्रान्स नवोन्मेष वर्ष २०२६’ उपक्रमाचे संयुक्त उद्घाटन करतील. सांस्कृतिक कार्यक्रमालाही उपस्थिती राहणार आहे.
यानंतर मोदी-मॅक्रॉन नवी दिल्लीतील ‘एआय इम्पॅक्ट समिट २०२६’साठी रवाना होतील. या परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान आणि स्टार्टअप क्षेत्रातील सहकार्यासाठी आराखडा निश्चित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महापौर प्रोटोकॉलची पुनर्स्थापना
मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ २०२२ मध्ये संपल्यानंतर महापौर पद रिक्त राहिले होते. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी रितू तावडे यांच्या निवडीने पहिल्या नागरिकाच्या भूमिकेतून राष्ट्रप्रमुखांचे स्वागत करण्याची परंपरा पुन्हा सुरू होत आहे.
वाहतूक निर्बंधांमुळे नागरिकांनी नियोजनपूर्वक प्रवास करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


