मुंबई प्रतिनिधी
रेल्वेत सरकारी नोकरीची वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. Indian Railways अंतर्गत ग्रुप डी संवर्गातील तब्बल २२,१९५ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी संबंधित रेल्वे रिक्रूटमेंट सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
रेल्वेतील ही भरती देशातील विविध विभागांमध्ये होणार असून निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार किमान १८,००० रुपये बेसिक पगार देण्यात येणार आहे. याशिवाय महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता आदी सुविधा लागू असतील. त्यामुळे एकूण वेतन रक्कम अधिक असण्याची शक्यता आहे.
पात्रता आणि वयोमर्यादा
या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २ मार्च २०२६ निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
• वयोमर्यादा : १८ ते ३३ वर्षे (आरक्षित प्रवर्गांना शासकीय नियमांनुसार सवलत)
• शैक्षणिक पात्रता : किमान बारावी उत्तीर्ण ते पदवीधर
• आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनाही अर्ज करता येणार
• पात्रतेबाबत सविस्तर अटी व शर्ती अधिकृत जाहिरातीत नमूद करण्यात आल्या आहेत.
निवड प्रक्रिया कशी?
ग्रुप डी पदांसाठी उमेदवारांची निवड प्रामुख्याने संगणक आधारित परीक्षा (CBT), शारीरिक चाचणी (PET) आणि कागदपत्र पडताळणी या टप्प्यांद्वारे होणार आहे. अंतिम निवड गुणवत्ता यादीनुसार केली जाईल.
अर्ज कसा करावा?
१. संबंधित रेल्वे रिक्रूटमेंट सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर जा.
२. होमपेजवरील भरतीसंदर्भातील लिंकवर क्लिक करा.
३. नवीन उमेदवारांनी प्रथम नोंदणी (Registration) करावी.
४. लॉग इन करून आवश्यक वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरा.
५. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
६. अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करा.
७. भविष्यातील वापरासाठी अर्जाचा प्रिंटआउट काढून ठेवा.
रेल्वेतील नोकरी ही स्थैर्य, वेतनमान आणि विविध शासकीय सुविधांमुळे तरुणांमध्ये लोकप्रिय मानली जाते. त्यामुळे मोठ्या संख्येने अर्ज येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच पुढील प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


