
बीड:प्रतिनिधी
बीड परळी मार्गावर आज सकाळी भीषण अपघात झाला. या घटनेत पोलिस भरती करणाऱ्या तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. एका भरधाव बसने ते व्यायाम करत असतांना त्यांना चिरडले. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
बालाजी मोरे, ओम घोडके, आणि विराज घोडके अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे तिघे पोलिस भरती करत होते. या साठी रोज सकाळी ते बीड परळी मार्गावर व्यायाम करण्यासाठी एकत्र येत असे. आज सकाळी देखील हे तिघे मित्र व्यायाम करण्यासाठी बीड परळी मार्गावर एकत्र आले होते. यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव एसटीने त्यांना धडक दिली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला.
काय आहे घटना ?
मिळालेल्या माहितीनुसार आज रविवारी सकाळी बीड परळी महामार्गावर सकाळच्या सुमारास पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी हे तीन तरुण व्यायाम करत होते. हे तिघे नेहमीप्रमाणे पहाटे व्यायाम करण्यासाठी जात असताना यावेळी मागून भरधाव वेगात येणाऱ्या एसटी बसने त्यांना धडक दिली. घोडका राजुरी गावाजवळ हा अपघात झाला. बसखाली सापडल्याने या तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर तातडीने ग्रामस्थांनी या तिघांना दवाखान्यात भरती केलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं. त्यांच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यावर नातेवाइकांनी आक्रोश केला. त्यांनी दवाखान्यात जात टाहो फोडला. पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले असून अपघात नेमका कसा झाला याच शोध पोलिस घेत आहे. हा अपघात बस सिमेंटच्या रस्त्यावरून खाली घसरून झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. अपघात सकाळी सहा वाजता झाला.