मालेगाव प्रतिनिधी
मालेगाव महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत ‘सेक्युलर फ्रंट’ने स्पष्ट बहुमताच्या जोरावर सत्ता काबीज केली. महापौरपदी इस्लाम पक्षाच्या नसरीन बानो खालिद शेख, तर उपमहापौरपदी समाजवादी पार्टीचे शान-ए-हिंद यांचा दणदणीत विजय झाला. त्यामुळे शिवसेना (शिंदे गट) शहरातील सत्तासंघर्षात एकाकी पडल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पार पडलेल्या विशेष सभेत ही निवडणूक झाली. यावेळी आयुक्त तथा प्रशासक रविंद्र जाधव, नगरसचिव साजिद अहमद उपस्थित होते. सुरुवातीला चुरशीची वाटणारी ही निवडणूक प्रत्यक्ष मतदानात मात्र एकतर्फी ठरली.
महापौर पदासाठी झालेल्या सरळ लढतीत नसरीन बानो यांना ४३ मते मिळाली, तर शिवसेना (शिंदे गट)च्या लता घोडके यांना १८ मतांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत समाजवादी पार्टीचे शान-ए-हिंद यांनीही ४३ मते मिळवत विजय मिळवला. शिवसेना शिंदे गटाचे नीलेश काकडे यांना येथेही १८ मते मिळाली. एमआयएमचे उमेदवार हाफिज अब्दुल्ला यांनी अर्ज मागे घेतल्याने ही लढत थेट झाली होती.
संख्याबळाचा निर्णायक प्रभाव
८४ सदस्यांच्या मालेगाव महापालिकेत इस्लाम पक्षाने सर्वाधिक ३५ जागा जिंकल्या असून, एमआयएमकडे २१, शिवसेना (शिंदे गट)कडे १८ जागा आहेत. समाजवादी पार्टीला ५, काँग्रेसला ३, तर भाजपला २ जागा मिळाल्या आहेत. इस्लाम व समाजवादी पार्टीने निवडणुकीपूर्वी ‘सेक्युलर फ्रंट’च्या नावाने आघाडी स्थापन केली होती. काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे या आघाडीने बहुमताचा जादुई आकडा सहज गाठला.
पडद्यामागील हालचाली निष्फळ
निवडणुकीपूर्वी एमआयएम व शिवसेना शिंदे गटात पडद्यामागे हालचाली सुरू असल्याच्या चर्चांना वेग आला होता. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी पक्ष तटस्थ राहील, अशी घोषणा केल्यानंतरही संभ्रम कायम होता. निवडणुकीच्या पूर्वसंध्येला शिवसेना शिंदे गटाचे नेते दादा भुसे आणि एमआयएमच्या नेत्यांमध्ये झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात ‘चमत्कार’ घडण्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र प्रत्यक्ष मतदानात एमआयएमने तटस्थ भूमिका कायम ठेवल्याने हे अंदाज फोल ठरले.
महापालिकेतील सत्ताकारणात आता सेक्युलर फ्रंटचा प्रभाव वाढला असून, आगामी काळात शहराच्या कारभारावर त्याचा ठसा उमटण्याची चिन्हे दिसत आहेत.


