रायगड प्रतिनिधी
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर शुक्रवारी पुन्हा एकदा भीषण वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागला. मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर अमृतांजन पूल ते खालापूर टोलनाका या दरम्यान सुमारे दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. सलग तीन तासांहून अधिक काळ वाहतूक संथ गतीने सुरू असल्याने प्रवासी अक्षरशः हैराण झाले.
खोपोली हद्दीत वाहने अक्षरशः रांगत पुढे सरकत होती. सकाळच्या वेळेपासूनच ही स्थिती कायम राहिल्याने प्रवासाचा कालावधी मोठ्या प्रमाणात वाढला. अनेक वाहनचालक तासनतास एकाच ठिकाणी अडकून पडले होते.
मतदान, विकेंड आणि रखडलेली वाहने – कोंडीची कारणे
उद्या (७ फेब्रुवारी) राज्यातील १२ जिल्हा परिषदांसाठी मतदान होत असून, त्या पार्श्वभूमीवर अनेक खासगी कंपन्या आणि आस्थापनांनी कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर केली आहे. मतदानासाठी गावी जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असल्याने एक्सप्रेस वेवर वाहनांचा ओघ वाढला आहे.
त्यातच शनिवार–रविवारचा विकेंड असल्याने पुणे, लोणावळा आणि महाबळेश्वरच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांचीही मोठी गर्दी झाली आहे. आडोशी बोगद्याजवळ झालेल्या टँकर अपघातामुळे मागील ३२ तासांपर्यंत हा मार्ग विस्कळीत होता. रस्ता मोकळा होताच रखडलेली वाहने एकाच वेळी मार्गावर आल्याने वाहतुकीवर प्रचंड ताण निर्माण झाला.
घाटात पेच, टोलनाक्यावर प्रतीक्षा
सकाळी लवकर घाट ओलांडण्याच्या घाईत अनेक वाहनचालकांनी एकाच वेळी प्रवास सुरू केल्याने खालापूर ते लोणावळा दरम्यान मोठा पेच निर्माण झाला. खालापूर टोलनाक्यावरही वाहनांचा भार वाढल्याने टोल भरण्यासाठी मोठा वेळ लागत होता.
या कोंडीचा सर्वाधिक फटका लहान मुले, वृद्ध आणि महिलांना बसला. पाणी, अन्न आणि स्वच्छतागृहांच्या सुविधांचा अभाव असल्याने अनेक प्रवाशांनी संताप व्यक्त केला.
वाहतूक पोलिसांचे उपाय, मात्र दिलासा संथ
वाहतूक पोलिसांकडून घाटातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. काही टप्प्यांवर अवजड वाहने थांबवून हलक्या वाहनांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र वाहनांचा वाढता ओघ पाहता ही कोंडी पूर्णपणे निस्तरण्यास आणखी काही तास लागण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, वारंवार होणाऱ्या अशा वाहतूक कोंड्यांमुळे द्रुतगती मार्गावरील व्यवस्थापन आणि नियोजनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


