मुंबई प्रतिनिधी
ग्रामीण आणि दुर्गम भागातील जनतेचा जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बससेवेचा प्रवास लवकरच महागण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळाने सर्व प्रकारच्या बस सेवांसाठी तिकीटदरात सरासरी दोन टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव सादर केला असून, त्यावर आज महत्त्वाचा निर्णय होणार आहे.
इंधन, वंगण तसेच सुट्ट्या भागांच्या किमतीत झालेली सातत्यपूर्ण वाढ, त्यातून वाढलेला देखभाल व दुरुस्ती खर्च आणि उत्पन्न–खर्चातील वाढती तूट, या कारणांमुळे भाडेवाढ अपरिहार्य असल्याचे महामंडळाचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज, शुक्रवारी, प्रस्तावावर आढावा बैठक होणार असून, त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मंजुरी मिळाल्यास, साध्या बसपासून ते वातानुकूलित आणि प्रीमियम सेवांपर्यंत एसटीच्या सर्व श्रेणीतील बससेवांना ही भाडेवाढ लागू होणार आहे. त्यामध्ये साधी बस, मिडी (यशवंत), हिरकणी यांसह शिवशाही, शिवाई (इलेक्ट्रिक), अश्वमेध, आसनी-शयनयान, विनावातानुकूलित शिवनेरी तसेच नव्याने दाखल झालेल्या ई-९ व १२ मीटर लांबीच्या सर्व इलेक्ट्रिक बसांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वी १४ जानेवारी २०२४ रोजी एसटीने सुमारे १४.९५ टक्क्यांची मोठी भाडेवाढ केली होती. त्या वेळी ग्रामीण भागात तीव्र असंतोष व्यक्त झाला होता. त्यानंतर, एकदम मोठ्या वाढीऐवजी टप्प्याटप्प्याने अल्प भाडेवाढ करण्याचे धोरण स्वीकारण्याच्या सूचना परिवहन मंत्र्यांकडून देण्यात आल्या होत्या. सध्याची दोन टक्क्यांची वाढ ही त्याच धोरणाचा भाग असल्याचे सांगण्यात येते.
एसटी ही शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी आणि ग्रामीण नोकरदार वर्गाची प्रमुख वाहतूक व्यवस्था आहे. त्यामुळे भाडेवाढ किरकोळ वाटत असली, तरी दररोज प्रवास करणाऱ्यांच्या मासिक खर्चावर तिचा परिणाम होणार हे निश्चित आहे. आजच्या बैठकीत सरकार या प्रस्तावावर काय निर्णय घेते आणि नवे दर नेमके कधीपासून लागू होतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


