मुंबई प्रतिनिधी
राज्यात महापालिका निवडणुकांनंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच, विधानसभा व विधानपरिषदेतील १५ आमदारांचा लंडन अभ्यासदौरा आयोजित करण्यात आला आहे. १५ ते २२ फेब्रुवारीदरम्यान हा दौरा पार पडणार असून, लंडनमधील प्रशासकीय कार्यपद्धती, शहरी व्यवस्थापन, पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक सेवांच्या अंमलबजावणीचा प्रत्यक्ष अभ्यास हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या अभ्यासदौर्यात नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यपद्धती, तसेच प्रशासन व लोकप्रतिनिधींमधील समन्वय यांचा सखोल आढावा घेतला जाणार आहे. आधुनिक शहरे कशा पद्धतीने नियोजनबद्धरीत्या चालवली जातात, याचा अभ्यास करून त्यातील उपयुक्त बाबी राज्यातील प्रशासनात राबवण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
या दौऱ्यात विविध पक्षांतील आमदारांचा समावेश आहे. भाजपकडून विक्रांत पाटील व निरंजन डावखरे, शिवसेनेकडून मनीषा कायंदे, तर उबाठा गटाकडून वरुण सरदेसाई यांचा सहभाग असणार आहे.
लंडन दौऱ्यावर जाणारे आमदार पुढीलप्रमाणे—
१. बाबासाहेब देशमुख
२. परिणय फुके
३. विक्रम पाचपुते
४. नमिता मुंदडा
५. निरंजन डावखरे
६. स्नेहा दुबे
७. विक्रांत पाटील
८. अमित गोरखे
९. विक्रम काळे
१०. विश्वजीत कदम
११. वरुण सरदेसाई
१२. मनीषा कायंदे
१३. सुमित वानखेडे
१४. योगेश टिळेकर
सूत्रांच्या माहितीनुसार, या अभ्यासदौर्यात आणखी एका आमदाराचा समावेश होण्याची शक्यता असून, त्यांचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. प्रशासकीय सुधारणा आणि आधुनिक व्यवस्थापनाच्या दृष्टीने हा दौरा राज्याच्या राजकारणात आणि प्रशासनात चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.


