हैदराबाद : प्रतिनिधी
भाग्यनगर सरस्वती साहित्य सेवा संगमचा २३ वा स्थापना दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर सरस्वती वंदना सादर करण्यात आली.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रोहित चेबरोलु, गजानन बिडकर, झारखंड एकता मंचचे जयंत शर्मा तसेच राजू देशपांडे उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष उदयकुमार नाईक यांनी संस्थेच्या २३ वर्षांच्या कार्याचा आढावा घेत साहित्य, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या सचिवांनी केले.
यावेळी गजानन बिडकर यांनी ‘पत्रकारिता व आव्हाने’ या विषयावर मार्गदर्शन करत ‘भाषा सेतू’ या त्रैमासिकाला डिजिटल प्लॅटफॉर्मवर नेण्याची गरज व्यक्त केली. तसेच संस्थेची स्वतंत्र संकेतस्थळ उभारून साहित्यिक विचार जागतिक स्तरावर पोहोचविण्याबरोबरच युवा पिढीला संस्थेशी जोडण्याचे आवाहन त्यांनी केले.
जयंत शर्मा यांनी समाजात एकता व संघटन शक्ती वाढविण्याचे महत्त्व अधोरेखित केले. राजू देशपांडे यांनी विविध क्षेत्रात कार्यरत व्यक्तींचा स्थानिक स्तरावर सन्मान केल्यास इतरांना प्रेरणा मिळते, असे मत व्यक्त केले.
या वेळी मान्यवरांच्या हस्ते ‘भाषा सेतू’ त्रैमासिकाच्या नव्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. अंकाच्या संपादकीय, रचना व पृष्ठ मांडणीबाबत प्रधान संपादक व संपादक मंडळाचे विशेष कौतुक करण्यात आले. संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या लता संधी यांनी यूजीसीवर आधारित आधुनिक कविता सादर केली.
कोंडे सर प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नसले तरी त्यांनी संदेशाद्वारे शुभेच्छा देत अल्पोपहाराची व्यवस्था केली. कार्यक्रमाचा समारोप मिलिंद पाठक यांनी केला. संस्थेचे कार्य व त्रैमासिक डिजिटल माध्यमातून पुढे नेण्यासाठी संस्था सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तुम्मा जनार्दन, चंद्रकांत जामवाले, पी. नारायणा, मानसी पाठक, अंकिता पाठक, अर्चना जोशी, गिरीश बिडकर, गौरव बिडकर, माधुरी बिडकर, प्रतीक पाठक आदींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.


