बेंगळुरू:
कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथे आयकर विभागाच्या चौकशीदरम्यान कॉन्फिडेंट ग्रुपचे चेअरमन व मालक, प्रसिद्ध उद्योजक सी. जे. रॉय यांनी गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली. या घटनेमुळे उद्योगविश्वात एकच खळबळ उडाली आहे.
बेंगळुरूतील रिचमंड सर्कल परिसरात असलेल्या कॉन्फिडेंट ग्रुपच्या कार्यालयात आयकर विभागाकडून नियमित चौकशी सुरू होती. याचवेळी सी. जे. रॉय हे कार्यालयातील एका खोलीत गेले आणि त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आयुष्य संपवले. घटनेच्या वेळी आयकर विभागाचे अधिकारी इमारतीत उपस्थित होते; मात्र संबंधित खोलीत कोणताही अधिकारी नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सी. जे. रॉय यांच्या कार्यालयावर यापूर्वीही डिसेंबर २०२५ मध्ये आयकर विभागाने छापा टाकला होता. त्यानंतर पुढील चौकशीचा भाग म्हणून शुक्रवारी पुन्हा तपास सुरू होता. आयकर विभागाकडे त्यांच्या उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा अधिक मालमत्ता असल्याचे काही पुरावे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या सततच्या चौकशीमुळे ते मानसिक तणावाखाली होते, असेही प्राथमिक तपासात समोर येत आहे.
घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला असून आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कोणतीही सुसाईड नोट आढळली नसल्याचेही पोलिसांनी सांगितले.
सी. जे. रॉय यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून, कॉन्फिडेंट ग्रुपमधील कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. रिअल इस्टेट आणि ग्राहक क्षेत्रात महत्त्वाची ओळख असलेला हा उद्योगसमूह त्यांच्या नेतृत्वाखाली वेगाने विस्तारला होता. या दुर्दैवी घटनेने उद्योगजगतात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.


