सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील दुर्गम भागात गुजरात राज्यातून आलेल्या अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या गुप्त कारवाईने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या कारवाईत सुमारे ६ हजार कोटी रुपयांच्या एमडी (मेफेड्रोन) ड्रग्सशी संबंधित कच्चा माल व साहित्य जप्त करण्यात आल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे.
गुजरातमधील डीआरआय (डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स) विभागाच्या पथकाने कराड तालुक्यातील पाचपुतेवाडी परिसरात असलेल्या एका मोठ्या शेडवर धाड टाकली. या कारवाईचे नेतृत्व आयपीएस दर्जाचे तीन वरिष्ठ अधिकारी करत होते. विशेष म्हणजे ही संपूर्ण कारवाई अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली होती. त्यामुळे सातारा जिल्हा पोलिसांनाही याची पूर्वकल्पना नव्हती.
या शेडचा मालक बाबा मोरे याला ताब्यात घेण्यात आले असून, एमडी ड्रग्स तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन, यंत्रसामग्री व कच्चा माल मोठ्या प्रमाणात हस्तगत करण्यात आला आहे. संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून, काही बिहार राज्यातील युवकांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. हे पथक सध्या कराडमध्येच तळ ठोकून असून पुढील तपास सुरू आहे.
खून प्रकरणातील आरोपीच मुख्य सूत्रधार
या प्रकरणाला आणखी गंभीर वळण देणारी बाब म्हणजे अटक करण्यात आलेला बाबा मोरे हा एका गाजलेल्या खून प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे. महाराष्ट्र केसरी विजेते संजय पाटील यांच्या गोळ्या झाडून करण्यात आलेल्या हत्येप्रकरणात मोरेवर गंभीर आरोप आहेत. याशिवाय त्याच्यावर विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असून, याच परिसरात त्याचा बनावट दारू निर्मितीचा कारखानाही पूर्वी उघडकीस आला होता.
साताऱ्यात दुसरी मोठी कारवाई
साधारण महिनाभरापूर्वी साताऱ्यातील बामणोली परिसरातही अशाच प्रकारे दुर्गम भागात एमडी ड्रग्स निर्मितीचा कारखाना उघडकीस आला होता. मुंबईहून आलेल्या पथकाने तेथे कोट्यवधी रुपयांचा साठा जप्त केला होता. त्या प्रकरणाचा तपास अद्याप पूर्ण झालेला नसतानाच ही दुसरी मोठी कारवाई झाल्याने सातारा जिल्ह्यात अमली पदार्थांचे वाढते जाळे पुन्हा चर्चेत आले आहे.
या संपूर्ण प्रकरणाबाबत अद्याप अधिकृत पातळीवर कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र या कारवाईमुळे सातारा जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेवर आणि स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.


