पुणे प्रतिनिधी
राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय तसेच खासगी व्यवस्थापनांच्या शाळांना प्रजासत्ताकदिनी (२६ जानेवारी) सुट्टी राहणार नाही. त्या दिवशी देशभक्तिपर गीतांवर आधारित सामूहिक कवायत संचलन कार्यक्रम आयोजित करणे अनिवार्य करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.
‘राष्ट्र प्रथम’ या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येणार असून, राज्यातील एक लाखांहून अधिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील सुमारे दोन कोटी दहा लाख विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होणार आहेत. या उपक्रमाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत सिंह बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी, सचिव डॉ. दीपक माळी, शिक्षण विभागाचे सहसंचालक हारून अत्तार आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर उपस्थित होते.
प्रजासत्ताकदिनी शासकीय झेंडावंदन कार्यक्रमानंतर सुमारे वीस मिनिटांचा सामूहिक कवायत संचलन कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांचा सराव ‘आनंददायी शनिवारी’ करून घेण्याच्या सूचना यापूर्वीच शाळांना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त, आरोग्याबाबत जागृती तसेच व्यायामाची गोडी निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे सिंह यांनी सांगितले.
कवायतीसाठी एनसीसी व स्काउटचे विद्यार्थी मदत करू शकतील. एकाच परिसरात असलेल्या प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांनी एकत्रितपणे संचलन कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या दिवशी विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती राहील, याची दक्षता शाळा व्यवस्थापनांनी घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
क्रीडा शिक्षकांची भरती
राज्यातील अनेक शाळांमध्ये ‘पीटी’चा तास गांभीर्याने घेतला जात नसल्याची खंत व्यक्त करताना सिंह म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासाइतकेच खेळ आणि व्यायाम महत्त्वाचे आहेत. त्यामुळे शाळांना क्रीडा शिक्षक उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.”
राज्यातील चार हजार ८६० केंद्र शाळांमध्ये क्रीडा शिक्षक पदांची निर्मिती करण्यात आली असून, या पदांवर लवकरच भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.


