पुणे प्रतिनिधी
लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांच्या पसंतीचा हापूस आंबा पुण्याच्या बाजारात दाखल होऊ लागला आहे. कोकणातील विविध भागांतून सध्या हापूसची तुरळक आवक सुरू झाली असून, फेब्रुवारीच्या १५ ते २० तारखांदरम्यान आवक नियमित होईल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. आवक मर्यादित असल्याने सध्या दर उच्च पातळीवर आहेत.
मार्केट यार्डातील व्यापारी सुधीर मनसुख यांच्या गाळ्यावर रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर येथून हापूसच्या चार पेट्या दाखल झाल्या. प्रत्येकी तीन डझन आंबे असलेल्या या पेट्यांना घाऊक बाजारात प्रत्येकी १५ हजार रुपयांचा दर मिळाला. या पेट्यांची खरेदी फळ व्यापारी युवराज काची यांनी केली. याच वेळी केशर आंब्याच्या एका पेटीचीही पहिली आवक झाली आहे. यापूर्वीही कोकणातून काही प्रमाणात हापूसच्या पेट्या बाजारात आल्या होत्या.
सध्या आवक कमी असल्यामुळे दर अधिक असले, तरी येत्या काळात आवक वाढल्यानंतर दरात घट अपेक्षित असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. हवामान पोषक राहिल्याने यंदा मागील वर्षाच्या तुलनेत झाडांना चांगली फळधारणा होण्याची शक्यता असून, त्यामुळे हंगामात दर तुलनेने कमी राहतील, असे व्यापारी युवराज काची यांनी सांगितले.
या वेळी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश घुले, फळ विभाग प्रमुख बाळासाहेब कोंडे यांच्यासह दादासाहेब बांदल, अजय वाखारे, नाना मस्के, शरद कुंजीर, प्रकाश भडकुंबे, प्रीतम परदेशी, बालाजी राठोड, हुसेन मणियार, नाना राठोडे, हनुमंत शिवरे आदी उपस्थित होते.


