सांगली प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यातील झरे येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत झालेल्या धाडसी चोरीचा उलगडा करण्यात सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. २२ लॉकर फोडून चोरीस गेलेला सव्वा तीन कोटी रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला असून या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी बुधवारी दिली.
७ जानेवारीच्या रात्री बँकेच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने २२ लॉकर फोडले. लॉकरमधील सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच देवांच्या मूर्ती लंपास करण्यात आल्या होत्या. तपासादरम्यान या गुन्ह्यात राहूल रंजमीश शर्मा (३०, ककराला, जि. बधायू – उत्तर प्रदेश), विश्वजित विजय पाटील (२४, बांबवडे, ता. पलूस), संकेत अरुण जाधव (२६, बलवडी, ता. खानापूर) आणि इजाज राजू अत्तार (३०, आमणापूर) यांचा सहभाग उघड झाला.
यातील विश्वजित पाटील हा गलाई कामगार असून उत्तर प्रदेशातील शर्मा याच्याशी असलेल्या ओळखीच्या आधारे चोरीचा डाव आखण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. पलूस येथील एका हॉटेलमध्ये संशयितांनी मुक्काम केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. शर्मा याला उत्तर प्रदेशातून ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत अन्य संशयितांची नावे समोर आली.
दरम्यान, सांगलीवाडी परिसरात एका मोटारीतून येत असलेल्या उर्वरित संशयितांना अटक करण्यात आली. वाहनाच्या झडतीत एक गावठी पिस्तूल व चार काडतुसे सापडली. तसेच चोरीतील सोन्या-चांदीचे दागिने विक्रीसाठी आणल्याचे आढळून आले. शर्मा व अन्य आरोपींकडून दागिने तसेच चांदीच्या देवमूर्ती हस्तगत करण्यात आल्या.
बँकेतील लॉकरमधील सोन्याचे दागिने वितळवून लगडी बनविण्यात आल्याचे तपासात उघड झाले. हस्तगत करण्यात आलेल्या ऐवजात १ किलो १६८ ग्रॅम वजनाच्या, १ कोटी ५७ लाख ६८ हजार रुपयांच्या सोन्याच्या लगडी, सुमारे ८७ लाख रुपयांचे चांदीचे दागिने व देवमूर्ती, तसेच ७० लाखांचे सोन्याचे दागिने आणि ५१ हजार ६०० रुपयांची रोकड असा एकूण ३ कोटी २५ लाख ५४ हजार ६०० रुपयांचा ऐवज आहे.
चोरीनंतर मागमूस लागू नये म्हणून चोरट्यांनी बँकेतील सीसीटीव्हीचा डीव्हीआरही सोबत नेल्याने तपास आव्हानात्मक ठरला होता. मात्र, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने केलेल्या सातत्यपूर्ण शोध मोहिमेमुळे ही चोरी उघडकीस आली असून मोठ्या प्रमाणावर ऐवज जप्त करण्यात यश आले आहे.


