मुंबई प्रतिनिधी
मुंबई महापालिकेतील राजकीय हालचालींना वेग आला असतानाच शिवसेना (ठाकरे गट) यांना शहरात पहिला मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे. प्रभाग क्रमांक १५७ मधून निवडून आलेल्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के शिंदे यांनी ठाकरे गटाची साथ सोडल्याची माहिती समोर येत आहे. त्या शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे संकेत मिळत असून, त्यामुळे ठाकरे गटातील अस्वस्थता वाढली आहे.
सेना भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या नगरसेवकांच्या बैठकीला डॉ. सरिता म्हस्के गैरहजर राहिल्या. तसेच गट नोंदणीसाठी ठाकरे गटाचे नगरसेवक नवी मुंबईकडे रवाना झाले असतानाही त्या अनुपस्थित राहिल्याने संशय अधिक बळावला. प्रभाग १५७ मध्ये त्यांनी भाजपच्या आशा तायडे यांचा पराभव करत विजय मिळवला होता.
मुंबईत ठाकरे गटाचे एकूण ६५ नगरसेवक निवडून आले आहेत. महापौरपदासाठी शिंदे गट आणि भाजपमध्ये हालचाली तीव्र झाल्या असताना, दोन्ही बाजूंनी इतर नगरसेवकांना आपल्या गोटात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे. अशा पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील नगरसेविकेची फूट ही पक्षासाठी धक्कादायक मानली जात आहे.
दरम्यान, सरिता म्हस्के शिंदे शिंदे गटात सहभागी झाल्यास ठाकरे गटातील संख्याबळ ६४ वर येईल. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून त्यांना अपात्र ठरविण्याच्या दृष्टीने कायदेशीर हालचाली सुरू करण्यात आल्याची माहिती आहे.
किशोरी पेडणेकर गटनेतेपदी
ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या बैठकीत किशोरी पेडणेकर यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. या निर्णयावर बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.
कल्याण-डोंबिवलीतही फूट
याआधी कल्याण-डोंबिवली महापालिकेत ठाकरे गटाच्या ११ पैकी चार नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. उर्वरित सात नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपण एकत्र असल्याचे स्पष्ट केले. “सत्ता स्थापनेसाठी फोन येत आहेत; मात्र वरिष्ठांच्या भूमिकेनंतरच निर्णय घेऊ,” असे त्यांनी सांगितले. महापालिकेत सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. शिंदे गट आणि मनसेला साथ देणाऱ्या नगरसेवकांवर कारवाईचा इशाराही ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे.
या घडामोडींमुळे मुंबई आणि उपनगरांतील शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आगामी महापालिका राजकारणावर त्याचे परिणाम जाणवण्याची शक्यता आहे.


