मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जाणारा बेलासिस उड्डाणपूल अखेर पूर्णत्वास आला असून, जानेवारी २०२६ च्या पहिल्या आठवड्यात तो नागरिकांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. ताडदेव, नागपाडा तसेच मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास या उड्डाणपुलामुळे अधिक सुलभ होणार आहे.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाची अंतिम मुदत एप्रिल २०२६ निश्चित करण्यात आली होती. मात्र संबंधित कंत्राटदारांनी समन्वय साधत कामाला गती दिल्याने उड्डाणपूल नियोजित वेळेआधीच पूर्ण करण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाकडून आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) प्राप्त झाल्यानंतर तो तातडीने वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.
दरम्यान, बेलासिस उड्डाणपुलाच्या नावात बदल होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. ब्रिटिश काळात बांधण्यात आलेल्या जुन्या पुलाच्या नावाशी संबंधित ऐतिहासिक संदर्भांचा विचार करता, या नावाचा भारतीय संस्कृतीशी किंवा महाराष्ट्राच्या इतिहासाशी थेट संबंध नसल्याचे मत व्यक्त होत आहे. त्यामुळे कार्नाक पुलाचे नाव बदलून ‘सिंदूर’ ठेवण्यात आले, त्याच धर्तीवर बेलासिस उड्डाणपुलालाही नवे नाव देण्याचा विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जून २०२४ मध्ये जुन्या पुलाचे पाडकाम करून नव्या उड्डाणपुलाच्या उभारणीला सुरुवात करण्यात आली होती. सुमारे ३५० मीटर लांबीचा हा केबल-स्टेड डिझाइनचा आधुनिक उड्डाणपूल उभारण्यासाठी महापालिकेने ७० कोटी रुपये, तर रेल्वे विभागाने ४० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले की, सप्टेंबर २०२४ मध्ये बांधकामाचे आदेश दिल्यानंतर प्रकल्पाच्या प्रगतीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात आले. महापालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमआरआयडीसी) यांच्यातील प्रभावी समन्वयामुळे हा प्रकल्प वेळेआधी पूर्ण होऊ शकला. कामादरम्यान उद्भवणाऱ्या अडचणी तातडीने सोडवण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
उड्डाणपूल खुला झाल्यानंतर मुंबई सेंट्रल परिसरातील वाहतूक प्रवाह अधिक गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.


