मुंबई प्रतिनिधी
चर्चगेट ते विरारदरम्यान प्रवास करणाऱ्या लाखो सर्वसामान्य प्रवाशांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वेने या मार्गावर आणखी १२ वातानुकूलित (एसी) लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला असला, तरी त्यासाठी तितक्याच म्हणजे १२ सर्वसाधारण लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. ही व्यवस्था २६ जानेवारीपासून लागू होणार आहे.
मागणी वाढल्याच्या पार्श्वभूमीवर एसी लोकलची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र नव्या एसी लोकल सामान्य लोकलच्या जागी चालवण्यात येणार असल्याने एकूण लोकल फेऱ्यांच्या संख्येत कोणतीही वाढ होणार नाही. पश्चिम रेल्वेच्या उपनगरी सेवेत सहा अप आणि सहा डाउन अशा एकूण १२ नव्या एसी फेऱ्या समाविष्ट करण्यात येणार आहेत. त्यामुळे एसी लोकलची संख्या १०९ वरून १२० इतकी होईल, तर एकूण लोकल फेऱ्यांची संख्या १,४०६ इतकीच कायम राहणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली.
दरम्यान, एसी लोकल सुरू झाल्यापासून आतापर्यंत शंभरहून अधिक सर्वसाधारण लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. परिणामी एसी लोकलच्या आधी आणि नंतर धावणाऱ्या सामान्य लोकलमध्ये प्रचंड गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेषतः दुपारच्या वेळेत सलग एसी लोकल असल्याने सामान्य लोकलसाठी प्रवाशांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते.
सर्वसाधारण लोकल रद्द करून एसी लोकल चालवू नयेत, अशी स्पष्ट भूमिका प्रवासी संघटनांनी रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठकीत वारंवार मांडली आहे. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करून रेल्वे प्रशासन एसी लोकलला प्राधान्य देत असल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात येत आहे. ‘सामान्य प्रवाशांचा विचार न करता निर्णय घेतले जात आहेत,’ अशी नाराजी प्रवासी संघटनांनी व्यक्त केली आहे.


